जेएनएन, पुणे. Pune Crime News: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे 10 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. तपासादरम्यान आरोपीने पोलिसांना मदत करण्याचे नाटक केल्याचेही समोर आले असून, त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर गुन्ह्याची उकल झाली.
माहितीनुसार, पिंपळवंडी येथील रहिवासी योगेश पवार यांची मुलगी इयत्ता चौथीत शिकत होती. मुलगी आजारी असल्याने ती मंगळवारी शाळेत गेली नाही. दुपारी पालक घरात नसताना आरोपीने संधी साधून तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर तिची हत्या केल्याचा आरोप आहे.
काही वेळानंतर मुलगी घरात दिसून न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. नातेवाईक आणि ग्रामस्थांनीही परिसरात शोधाशोध केली; मात्र, मुलगी सापडली नाही. त्यामुळे अखेर आळेफाटा पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपास सुरू असताना संशयित आरोपीदेखील इतर ग्रामस्थांसोबत पोलिसांना मदत करत असल्याचे नाटक करत होता. मात्र, त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी करताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगितले.
चिमुकलीचा मृतदेह आढळला निष्प्राण अवस्थेत
आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ‘लेंडे स्थळ’ परिसरात शोधमोहीम राबवली. परिसरातील एका ओढ्याकाठी झाडाजवळ चिमुरडीचा मृतदेह निष्प्राण अवस्थेत आढळून आला. या घटनेनंतर पिंपळवंडी गावासह परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, मृतदेह पोस्टमार्टम तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात नेमके अत्याचार आणि हत्या कशा प्रकारे करण्यात आली, तसेच आरोपीने मृतदेह का नेला, याचा पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहेत.
