धाराशीव. संपूर्ण देशभरात आज 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा केला जात आहे. यानिमित्त सर्वत्र उत्साहाचे व देशभक्तीने भारलेले वातावरण असतानाच धाराशीवमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ऑन ड्युटी पोलिस कर्मचाऱ्याचा तिरंग्याला सलामी देतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. झेंडावंदनानंतर सहकाऱ्यांसोबत ग्रुप फोटो काढत असताना पोलीस अधिकारी चक्कर येऊन जमिनीवर कोसळला ते परत उठलाच नाही. या घटनेत त्यांच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलीस वर्गातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मोहन भीमा जाधव (वय 55) असे मृत पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन केल्यानंतर थोड्याच वेळात मोहन जाधव यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तलमोड येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार मोहन जाधव हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील होते व तलमोड चेक पोस्टवर एक्साईज इन्स्पेक्टर म्हणून कर्तव्य बजावत होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी सकाळी चेक पोस्टवर ध्वजवंदन केले. त्यानंतर उपस्थितांसोबत फोटो काढत असतानाच मोहन जाधव यांना अस्वस्थ वाटू लागले. कोणाच्या काही लक्षात येण्याआधीच चक्कर येऊन जाधव जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. पण रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.
मोहन जाधव कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून विभागात त्यांची ओळख होती. त्याचबरोबर त्यांना नुकतेच प्रमोशन मिळालं होतं. त्यांनी सोलापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागात अनेक वर्षे प्रामाणिक सेवा दिली होती. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच त्यांना पीएसआय पदावर बढती मिळाली होती. नव्या पदाची जबाबदारी उत्साहाने सांभाळत असतानाच नियतीने त्यांच्यावर घाला घातला. यंदाच्या प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाला दिलेली सलामी ही त्यांची अखेरची सलामी ठरली.
या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यामध्ये सर्व कर्मचारी शिस्तबद्ध पद्धतीने तिरंग्याला सलामी देत असताना जाधव अचानक कोसळताना दिसत आहेत. कर्तव्य बजावतानाच जगाचा निरोप घेतल्याने सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणावर श्रद्धांजली वाहिली जात आहे.
