नाशिक. नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ, मानसिक त्रास आणि कथित धर्मांतराच्या प्रयत्नांशी संबंधित बहुचर्चित प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात आता एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे.

नाशिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. या पथकाकडून आतापर्यंत अनेक संशयितांची चौकशी करण्यात आली असून विविध पुरावे गोळा केले जात आहेत. तपासादरम्यान एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांचे नाव समोर आल्याची माहिती आहे. निदा खान हिला आश्रय देण्याच्या प्रकरणात त्यांची भूमिका असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या अनुषंगाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.

मतीन पटेल यांच्या मोबाईलमधील रेकॉर्डिंगमुळे तपासाला दिशा

या प्रकरणात यापूर्वी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्याविरोधातही निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. एसआयटीकडून त्यांची चौकशी सुरू असताना त्यांच्या मोबाईल फोनमध्ये काही महत्त्वाची ध्वनिमुद्रणे (रेकॉर्डिंग) आढळल्याची माहिती समोर आली आहे. या रेकॉर्डिंगच्या आधारे तपासाची व्याप्ती वाढवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

या ध्वनिमुद्रणांमध्ये इम्तियाज जलील यांचा आवाज असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी जलील यांचा जबाब नोंदवला असून त्यांचे व्हॉइस सॅम्पलही घेतल्याची माहिती आहे. या ध्वनिमुद्रणांची आणि आवाजाच्या नमुन्यांची पडताळणी केली जाणार आहे. 

निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप

    नाशिकमधील TCS प्रकरणात निदा खान ही महत्त्वाची आरोपी आहे. कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांवर कथितरीत्या मानसिक दबाव टाकणे, धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करणे आणि धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करणे, असे आरोप तिच्यावर आहेत. या प्रकरणात तिचा शोध सुरू असताना तिला आश्रय आणि मदत कोणी केली, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत होता.

    याच तपासादरम्यान मतीन पटेल यांच्यासह इम्तियाज जलील यांचे नाव समोर आल्याची माहिती आहे. निदा खानला आश्रय देण्याच्या प्रकरणात जलील यांचा नेमका सहभाग काय होता, याचा तपास एसआयटीकडून केला जात आहे. या संदर्भात तपास पथकाने न्यायालयालाही माहिती दिल्याची माहिती समोर आली आहे.