नाशिक. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात प्रेमसंबंधातून एका 18 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या भावाने तिच्या प्रियकरावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे सापगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत तरुणाचे नाव आर्यन सोमनाथ कांबळे (वय 18) असे आहे. तर संशयित आरोपीचे नाव आदित्य एकनाथ मोंढे असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, आर्यन आणि आदित्यच्या बहिणीमध्ये प्रेमसंबंध होते. याच संबंधांवरून आदित्यचा आर्यनसोबत वाद झाला होता. या वादातूनच त्याने आर्यनवर चाकूने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगाव ते ब्रह्मगिरी फेरी मार्गावरील स्मशानभूमीजवळ घडली. संशयित आदित्यने आर्यनवर चाकूने हल्ला करत त्याच्या पोटावर, गळ्यावर, छातीवर आणि हातावर वार केले. या हल्ल्यात आर्यन गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याची मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणातील संशयित आदित्य एकनाथ मोंढे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, अवघ्या 18 वर्षांच्या तरुणाचा प्रेमसंबंधाच्या वादातून जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर थेट हत्येत झाल्याने या घटनेने पुन्हा एकदा तरुणांमधील वाद आणि त्यातून घडणाऱ्या हिंसक घटनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस करत आहेत.
