जेएनएन, अहिल्यानगर: जिल्ह्यातील प्रसिद्ध शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ राज्य सरकारने बरखास्त केले आहे. देवस्थानच्या प्रशासनात गेल्या काही काळापासून अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार, बनावट ॲपच्या माध्यमातून भाविकांची फसवणूक आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर तक्रारी येत होते. या सर्व बाबीचा विचार करून शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकारी प्रशासक म्हणून नेमणूक
शासनाने विश्वस्त मंडळ बरखास्त करत देवस्थानचे प्रशासन सध्या जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवले आहे. प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी देवस्थानची स्थावर मालमत्ता, भाविकांच्या सोयीसुविधा, धार्मिक कार्यक्रमांचे व्यवस्थापन तसेच मंदिरातील पारदर्शकता राखण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत.
भ्रष्टाचाऱ्यावर कारवाई
शनैश्वर देवस्थान हा राज्यातील सर्वाधिक प्रसिद्ध देवस्थानांपैकी एक मानला जातो. दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात. अशा प्रतिष्ठित देवस्थानात आर्थिक गैरव्यवहार, निधीतील अपहार, बनावट ॲपद्वारे भाविकांची फसवणूक, तसेच कार्यप्रणालीतील पारदर्शकतेचा अभाव यासंबंधी गंभीर तक्रारी समोर आले होते. शासनाने या सर्व बाबींची तपासणी करून अखेर विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.
भाविकांच्या सोयीला प्राधान्य
प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी थेट जबाबदारी सांभाळणार असल्याने देवस्थान प्रशासनात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भाविकांच्या सोयीसुविधा, धार्मिक वातावरण आणि आर्थिक व्यवहारात पारदर्शकता यांना प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती शासनाकडून देण्यात आली आहे.
हे ही वाचा - Marathwada Rain Update: मराठवाड्यात पावसाने हाहाकार; 4 जणांचा मृत्यू, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी