जेएनएन, मुंबई. Nashik Ashok Kharat Case: समता नागरी सहकारी पतसंस्थेतील कथित मनी लाँडरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) तपासाची व्याप्ती आणखी वाढवत कारवाईचा फास अधिक घट्ट केला आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांची ईडी कार्यालयात तब्बल आठ तास कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान प्रतिभा चाकणकर यांनी केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
खरातने त्यांच्या नावाने बनावट बँक खाती उघडल्याचा आरोप
चौकशीदरम्यान प्रतिभा चाकणकर यांनी ईडीसमोर सांगितले की, त्यांनी स्वतःचे तसेच त्यांच्या मुलाचे आधार कार्ड आणि पॅन कार्डचे तपशील धार्मिक कामासाठी अशोक खरात याच्याकडे दिले होते. मात्र, या कागदपत्रांचा गैरवापर करून खरातने त्यांच्या नावाने बनावट बँक खाती उघडल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
यापुढे त्यांनी असा दावा केला की, संबंधित खात्यांमध्ये अशोक खरात याचे नाव नॉमिनी म्हणून नमूद करण्यात आले होते. तसेच ही खाती उघडताना त्याचा मोबाईल क्रमांक वापरण्यात आला होता. त्यामुळे या व्यवहारांमध्ये आपला कोणताही थेट संबंध नसून आपली फसवणूक झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
40 लाख रुपयांचा परतावा मिळाल्याचा संशय
ईडीच्या प्राथमिक तपासात 2021 मध्ये या खात्यांमध्ये सुमारे 26 लाख रुपये जमा झाल्याचे समोर आले आहे. हे पैसे एका विशेष खात्यात वळवण्यात आले आणि 2024 पर्यंत तेथे ठेवण्यात आले. या गुंतवणुकीतून सुमारे 40 लाख रुपयांचा परतावा मिळाल्याचा संशय ईडीला आहे. या आर्थिक व्यवहारांचा नेमका उद्देश काय होता आणि त्यामागे कोणाचे नेटवर्क कार्यरत होते, याचा तपास सध्या सुरू आहे.
तन्मय चाकणकर याचीही होणार चौकशी!
या प्रकरणात ईडीने प्रतिभा चाकणकर यांच्या मुलगा तन्मय चाकणकर यालाही समन्स बजावले असून त्याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समता नागरी सहकारी पतसंस्थेतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून ईडीच्या पुढील चौकशीत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - Pune Rape Case: संतापजनक! ‘नराधमाने चिमुरडीच्या तोंडात Socks कोंबला अन्…’ पोस्टमार्टेममधून अत्यंत धक्कादायक खुलासे
