जेएनएन, नाशिक/नागपूर: राज्यात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात चौकशीदरम्यान मोठे खुलासे समोर येत आहेत. विशेष तपास पथक (SIT) समोर खरातने दिलेली प्रतिक्रिया आणि कबुलीजबाबामुळे या प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली आहे.

SIT समोर खरातचं विधान

SIT चौकशीत अशोक खरातने “माझं मरण इथेच” अशी भावनिक प्रतिक्रिया दिल्याची माहिती मिळत आहे . याचवेळी त्याने फसवणुकीच्या काही गुन्ह्यांची कबुली दिल्याचंही समोर आलं आहे. चौकशीत आर्थिक गैरव्यवहार, महिलांची फसवणूक आणि प्रभावशाली ओळखींचा गैरवापर यासारख्या गंभीर बाबी उघड होत आहेत. 

तपास अधिकाऱ्यांच्या मते, खरातने स्वतःला प्रभावशाली व्यक्ती असल्याचं भासवत अनेकांना गंडा घातला आहे. नोकरी, पदोन्नती आणि विविध शासकीय कामे करून देण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप आहे.  

फसवणुकीची व्याप्ती नागपूरपर्यंत 

या प्रकरणाचा विस्तार आता नागपूर पर्यंत झाल्याचं उघड झालं आहे. नागपूरमधील एका महिलेला तब्बल अडीच कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

    माहितीनुसार, पदोन्नती मिळवून देण्याच्या आमिषाने खरातने अहमदनगरमधील एजंटच्या माध्यमातून या महिलेकडून पैसे उकळले. स्वतःची ओळख मोठ्या राजकारणी, पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी असल्याचं सांगून त्याने विश्वास संपादन केला. मात्र प्रत्यक्षात कोणतीही पदोन्नती न झाल्याने फसवणूक उघडकीस आली. 

    पीडित महिलेनं एजंटविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. काही रक्कम परत मिळाल्यानंतर तक्रार मागे घेण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. 

    महिलांची फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहार 

    SIT च्या तपासात अनेक महिलांना लक्ष्य करून फसवणूक केल्याचे धागेदोरे मिळत आहेत. भावनिक आणि आर्थिक दोन्ही प्रकारे शोषण केल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत. या प्रकरणात आणखी अनेक पीडित पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.