जेएनएन, मुंबई/नाशिक: राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर या सध्या अडचणीत सापडल्या असून, नाशिकमधील भोंदू म्हणून चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात विशेष तपास पथकाने (SIT) त्यांची तब्बल सहा तास चौकशी केली. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी करण्यात आली.
अशोक खरातसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्यावर राजकीय दबाव वाढला होता. या वादानंतर त्यांना आधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागला. या दोन मोठ्या राजकीय धक्क्यांनंतर आता त्यांच्याभोवती चौकशीचं सावट गडद झालं आहे.
एसआयटीसमोर काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?
माहितीनुसार, चौकशीदरम्यान रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातसोबतचे संबंध पूर्णपणे आध्यात्मिक असल्याचा दावा केला.त्यांनी एसआयटीसमोर सांगितलं की,“माझं कुटुंब वारकरी संप्रदायाचं आहे. आध्यात्मिक श्रद्धेपोटी मी अशोक खरात आणि त्यांच्या पत्नीला गुरू मानलं होतं.”
याशिवाय, अशोक खरात यांच्यासोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. “माझे आणि अशोक खरातचे कोणतेही आर्थिक संबंध नाहीत. त्यांच्या ठिकाणी जाण्यासाठी मी कुणालाही आग्रह केलेला नाही,” असं त्यांनी चौकशीदरम्यान सांगितल्याचं समोर आलं आहे. तसेच, अशोक खरात यांच्या कथित गैरव्यवहारांची किंवा त्यांच्या दुसऱ्या बाजूची माहिती आपल्याला नव्हती, असाही दावा त्यांनी केला.
बहिणीचीही झाली चौकशी!
या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या बहिणी प्रतिभा चाकणकर यांचीही याआधी चौकशी करण्यात आली आहे. अशोक खरातने पतसंस्थेत उघडलेल्या कथित बोगस खात्यांच्या तपासादरम्यान त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.
चौकशीत पूर्ण सहकार्याचा दावा!
चौकशीनंतर बोलताना रुपाली चाकणकर यांनी आपण एसआयटीच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली असून तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करणार असल्याचं सांगितलं.
