जेएनएन, नाशिक. Sant Nivruttinath Maharaj Palkhi 2026: संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानापूर्वी संत निवृत्तिनाथ मंदिर परिसरात पारंपरिक पद्धतीने नारळ प्रसादाचा धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला वारकरी, भाविक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळपासूनच मंदिर परिसरात पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाची लगबग सुरू झाली होती. मंदिराची सजावट, पालखीची पूजा, मानकऱ्यांचे स्वागत आणि विविध धार्मिक विधी यामुळे परिसर भक्तिमय वातावरण तयार झाले. पारंपरिक विधीनुसार पालखी सोहळा निर्विघ्न आणि मंगलमय व्हावा, यासाठी प्रार्थना करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी पालखीचे मानकरी ह. भ. प. मोहन महाराज बेलापूरकर आणि ह. भ. प. बाळासाहेब देहूकर उपस्थित होते. तसेच राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर, विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार गोकुळ गिते यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहून संत निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि पालखी सोहळ्यास शुभेच्छा दिले.
कार्यक्रमाच्या आयोजनात संत निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळाने महत्त्वाची भूमिका बजावली. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ह. भ. प. राहुल साळुंखे, सचिव श्रीपाद कुलकर्णी, पालखी सोहळा प्रमुख ह. भ. प. माधवदास राठी महाराज, पुजारी ह. भ. प. जयंत महाराज गोसावी यांच्यासह सर्व विश्वस्त, पुजारी आणि सेवेकरी यांनी कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्था सुरळीत पार पाडली.
नारळ प्रसादाच्या कार्यक्रमानंतर पालखी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी अंतिम तयारी पूर्ण करण्यात आली. मंदिर परिसरात “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “जय जय रामकृष्ण हरी”च्या अखंड जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते. हजारो वारकरी आणि भाविक पालखीच्या प्रस्थानाची आतुरतेने प्रतीक्षा करत असून, यंदाचाही सोहळा भक्ती, परंपरा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
