नाशिक - जिल्ह्यातील सिन्नर येथे इशान्येश्वर मंदिर ट्रस्ट चालवणाऱ्या स्वयंघोषित बाबा अशोक खरात यांच्या अटकेमुळे समाजमन सुन्रान झाले असून याचे धक्के राजकीय वर्तुळाही बसत आहेत. 18 मार्च रोजी एका 35 वर्षीय महिलेने दाखल केलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यानंतर या प्रकाराचा वाच्याता झाली व आतापर्यंत खरातविरोधात 10 गुन्हे दाखल झाले असून त्यातील आठ एफआयआर बलात्काराशी संबंधित आहेत. एसआयटीच्या तपासात एक धक्कादायक खुलासा झाला आहे की, खरात आपल्या कार्यालयात 'सांकेतिक भाषेचा' वापर करत असे.
झुंबराची लाईट आणि कर्मचाऱ्याना इशारा -
तपासात असे उघड झाले आहे की, जेव्हा जेव्हा बाबा खरात 'शुद्धीकरणा'च्या नावाखाली एखाद्या महिलेला केबिनमध्ये बोलावायचा, तेव्हा तो खोलीतील झुंबराचा दिवा बंद करत असे. कर्मचाऱ्यांसाठी हा एक 'कोड' होता की आतमध्ये लैंगिक शोषणाची प्रक्रिया सुरू आहे आणि त्या काळात कोणत्याही बाहेरील व्यक्तीला आत प्रवेश करण्याची परवानगी नसायची बाबांच्या केबिनमध्ये अशा काचा बसवल्या होत्या की बाहेरून आतले दृश्य दिसत नव्हते, पण आतून बाहेरचे दृश्य दिसत होते.
एसआयटीकडे बऱ्याच तक्रारी -
महाराष्ट्र सरकारने आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी (SIT) स्थापन केली आहे. या पथकाने दोन मोबाईल क्रमांक जारी केले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या 5 दिवसांत 50 हून अधिक फोन आले असून, त्यांमध्ये लोकांनी खरातच्या गैरकृत्यांविषयी माहिती दिली आहे. तपास पथकाला दररोज सरासरी 15 ते 20 कॉल येत आहेत. एसआयटीने तक्रारदारांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
शस्त्र परवाना निलंबित -
नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अशोक खरात यांचा रिव्हॉल्व्हर परवाना नैतिक पतनाचे कारण देत निलंबित केले आहे. अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, खरातने पीडितांना घाबरवण्यासाठी आपल्या शस्त्रांचा वापर केला असावा. शुक्रवारी, एसआयटीने फॉरेन्सिक टीमच्या मदतीने खरातच्या कार्यालयातून फायली, कागदपत्रे आणि एक डायरी जप्त केली, ज्यामुळे अनेक मोठ्या नावांचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
जे ओळख उघड करतील त्यांच्यावरही होणार कारवाई -
पोलिसांनी केवळ खरातलाच नव्हे, तर सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे पीडित महिलांची ओळख उघड करणाऱ्या राहुल शिंदे आणि योगेश आधव यांनाही अटक केली आहे. पीडितांच्या गोपनीयतेशी छेडछाड करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
