नाशिक - सिन्नरमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने राज्यात खळबळ माजली असून या प्रकरणात दररोज नवनवीन कांड समोर येत आहेत. अनेक महिलांचा लैंगिक छळ तसेच दमदाटी करून त्याने अनेक जमिनी लाटल्याचे समोर आल्यानंतर आणखी तीन गुन्हे त्याच्याविरोधात दाखल झाले आहेत. त्यात त्याने विद्यार्थिनीलाही सोडले नसल्याचे समोर आल्याने सर्वच हादरले आहे.
खरातची पोलीस कोठडीची मुदत आज संपत असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याची चौकशी करायची असल्याने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती पोलीस न्यायालयाला करणार आहेत.
भविष्य जाणून घेण्याच्या नादात अनेक महिला या बाबाच्या लैंगिक छळाला बळी पडल्या. या भोंदू बाबाचे लैंगिक शोषणाचे प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचं होत चाललं असून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येत आहेत. त्यातच आता त्याचे दोन कांड “तुर्की मध” विकून लोकांची फसवणूक आणि विद्यार्थिनीवर अत्याचार ही प्रकरणेही बाहेर आल्याने त्याचा पाय आणखी खोलात अडकला आहे.
काय आहे तुर्की मध -
अतिशय दुर्मिळ, कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक म्हणून तुर्की मध सांगून खरातने याच्या बाटल्या उद्योजक आणि राजकीय नेत्यांना पुरवल्या. तुर्कीमधील समुद्रातील गुहांमधून काढलेल्या या एल्व्हिश मधामध्ये शारीरिक अशक्तपणा दूर करण्याची विशेष क्षमता आहे. त्याने विशेषतः लैंगिक समस्यांनी त्रस्त असलेल्या पुरुषांना लक्ष्य केले होतं असंही उघड झालं.
या मधाची किंमत किती?
सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या कथित मधाची एक किलोची किंमत तब्बल 9 लाख रुपये ठेवली होती. अनेक बड्या धेंडांकडून तो प्रचंड पैसे उकळत असे. यातून त्याने कोट्यवधीची माया जमवल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरात हे पैसे स्वतःकडे ठेवण्याऐवजी ते त्याच्या ट्रस्ट खात्यांमध्ये जमा करायचा. ट्रस्टच्या माध्यमातून त्याने काळा पैसा पांढरा केला होता.
विद्यार्थिनीवर अत्याचार -
अशोक खरात सिन्नर येथील कार्यालयातच महिलांचा लैंगिक छळ करायचा. त्याने अनेक महिलांना बळी बनवल्याचे समोर आले आहेत. अजूनही काही महिला भीतीपोटी आणि सामाजिक दबावापोटी तक्रार करायला समोर येत नसल्याचे दिसत आहे. यामुळे पोलिसांनी एक खास हेल्पलाईन क्रमांक जाहीर करून महिलांना संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
आणखी 3 नवे गुन्हे दाखल
दरम्यान भोंदू खरात विरोधात आणखी तीन नवे गुन्हे दाखल झाले असून आता एकूण गुन्ह्यांची संख्या 6 वर पोहोचली आहे. खरातने अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप असून या नराधमाने विद्यार्थिनीला देखील सोडलं नाही, असा गंभार आरोपही त्याच्यावर आहे.
