जेएनएन, मुंबई/नागपूर - महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा फटका बसत आहे. यामध्ये  विदर्भ विभागात परिस्थिती गंभीर बनली आहे. आता या पावसामागे मोठं कारण समोर आले आहे. पॅसिफिक महासागरात तयार झालेले ‘रागासा’ (ragasa) हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

295 किमी प्रतितास वेगाने धडकणार वादळ!

‘रागासा’ चक्रीवादळाचा वेग तब्बल 295 किमी प्रतितास इतका असल्याचे सांगितले जात आहे. या वेगामुळे निर्माण होणारे वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

विदर्भाला सर्वाधिक फटका -

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, नागपूर, अकोला, वर्धा, यवतमाळ, अमरावती आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा सर्वाधिक परिणाम होणार आहे.

शेतकऱ्यांची सोयाबीन, कापूस आणि तुरीची पिकं मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. आधीच ओल्या दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर पुन्हा आस्मानी संकट कोसळण्याची भिती आहे. 

    प्रशासन सतर्क -

    राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाला याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे. नद्यांच्या काठावर आणि धरण परिसरात पूरस्थिती निर्माण होऊ शकते. एनडीआरएफच्या पथकांना सज्ज ठेवण्यात आलं आहे.

    30 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस-

    राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे.