जेएनएन, नागपूर: नागपूरमधील नामवंत कंत्राटदार पेनमाचा वेंकटेश्वर (पी.व्ही.) वर्मा उर्फ मुन्ना वर्मा यांच्या आत्महत्येप्रकरणी धक्कादायक वळण समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षातील शरद मैंद (Sharad Maind) यांना अटक केली आहे. यासोबतच मंजीत वाडे या आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

आत्महत्येची घटना

  • 1 सप्टेंबर रोजी नागपूरच्या राजनगर भागातील फ्लॅटमध्ये वर्मा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. 
  • घटनास्थळी आत्महत्येची चिठ्ठी सापडली असली, तरी मोबाईलमधील नोंदींवरून मोठ्या कर्जबाजारीपणामुळे त्रस्त असल्याचे दिसून आले.
  • वर्मांवर बँक कर्ज, सावकारी तसेच सुमारे 40 कोटी रुपयांपेक्षा अधिक थकीत सरकारी देयकांचा बोजा होता.

आरोपींना अटक!

  • शरद मैंद हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे यवतमाळ जिल्ह्यातील नेते आहेत. मैंद यांनी विधानसभा निवडणूक लढवली आहे.
  • मंजीत वाडे यांच्यावर अवैध सावकारी करून वर्मांकडून व्याज वसुलीसाठी दबाव आणल्याचा आरोप आहे.दरम्यान पोलिस तपासात आर्थिक दबाव आणि वसुलीमुळेच वर्मा यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
  • नागपूर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
  • या घटनेनंतर बांधकाम व कंत्राटदार संघटनांनी सरकारकडून थकीत देयके तातडीने अदा करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान माहितीनुसार, वेंकटेश्वर (पी.व्ही.) वर्मा उर्फ मुन्ना वर्मा यांच्या पत्नी ह्या अनुराधा या प्रभासच्या चुलत बहिणी आहेत. आणि मुन्ना वर्मा यांच्या आत्महत्येमुळे सध्या त्या चर्चेत आल्या आहेत.