जेएनएन, नागपूर: स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ, सुंदर, व हरित नागपूर साकारताना शहरातील रहिवासी परिसरांना नागपूर महानगरपालिकेने अधिक स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मनपातर्फे "स्वच्छ मोहल्ला स्पर्धा" आयोजित करण्यात आली असून, विजेत्या मोहल्ल्यांना विकासकामांसाठी तब्बल 1 कोटी 63 लाखांचा बक्षीस निधी दिला जाणार आहे. स्पर्धेसाठी गुरूवारपासून (ता.९) आवेदन करण्यासाठी नोंदणी सुरू करण्यात आली असून, https://forms.gle/LH8N8C5xnSFEryFp9 या लिंक द्वारे नोंदणी करता येणार आहे.
या निकषांवर केले जाईल मोहल्ल्याचे मूल्यांकन
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोहल्ल्याची पात्रता निश्चित करण्यात आली आहे. यात ज्या मोहल्ल्यांमध्ये 200 ते 500 घरे आहेत, ते या स्पर्धेसाठी अर्ज करू शकतात. मोहल्ल्यातील स्वच्छतेचे मोजमाप करताना केवळ कचरा व्यवस्थापनच नाही, तर सामाजिक सहभाग आणि नागरिक कर्तव्ये यावरही भर दिला जाईल. घराघरांतून ओला, सुखा आणि धोकादायक कचरा 100 टक्के वेगळा करणे. तसेच ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करणे, सिंगल-यूज प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी आणि आरआरआर (Reduce, Reuse, Recycle) तत्त्वाचा प्रभावी वापर. मोहल्ल्यातील बाग, सार्वजनिक स्थळे, पार्किंग, स्वच्छता व योग्य देखभाल करणे, रस्त्यावरच्या विक्रेत्यांना व दुकानदारांना कचरापेट्या उपलब्ध करणे, 'ब्लॅक स्पॉट्स' (कचरा टाकण्याची ठिकाणे) हटविणे व त्यावर देखरेख ठेवणे, तसेच 'रेड स्पॉट' (थुंकी) नियंत्रण व निर्मूलन करणे, नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये स्वच्छता जनजागृती करणे आणि कचरा व्यवस्थापनातील नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणे, बांधकामावरील ढिगाऱ्याचे व्यवस्थापन आणि रस्त्यांची स्वच्छता, या मोहल्ल्याचे मूल्यांकन विविध निकषांवर आधारावर केले जाणार आहे.

नोंदणी करण्यासाठी खाली दिलेल्या क्यूआर कोडचा वापर करावा..
1 कोटी 60 लाख रुपयांचे बक्षीस
नागपूर महानगरपालिकेने या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवली असून, विजेत्या मोहल्ल्यांना ही रक्कम केवळ पारितोषिक म्हणून न देता, विकास निधी म्हणून दिली जाणार आहे. यात प्रथम बक्षीस तीन मोहल्ले प्रत्येकी 25 लाख असे एकूण 75 लाख रुपयांचे, द्वितीय बक्षीस पाच मोहल्ल्यांना 10 लाख प्रमाणे एकूण 50 लाख रुपयांचे तृतीय बक्षीस सात मोहल्ल्यांना प्रत्येकी 5 लाख प्रमाणे एकूण 35 लाख असे 15 मोहल्ल्याकरिता एकूण 1 कोटी 60 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभाग घ्यावा असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त नाविन्यपूर्ण उपक्रम व जलद गतीने काम करणाऱ्या तीन मोहल्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. नोंदणी करण्यासाठी खाली दिलेल्या क्यूआर कोडचा वापर करावा.. https://forms.gle/LH8N8C5xnSFEryFp9