जेएनएन, नागपूर: असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्यावतीने आयोजित ‘खासदार औद्योगिक महोत्सव- ॲडव्हान्टेज विदर्भ-2026’ च्या तिसऱ्या आवृत्तीचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ परिसरात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारातून नागपूरमध्ये ऑटोमोबाईल उद्योगाचे पदार्पण झाले आहे, या सर्व प्रयत्नांतून येत्या 5 वर्षांत विदर्भाचा सर्वांगीण विकास साधण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. त्यांच्या उपस्थितीत विदर्भासाठी विविध चार गुंतवणूक करारही करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेक वर्षांपासून नागपुरात ऑटोमोबाईल उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरु होते ते आज फळाला आले आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने नागपुरात एकात्मिक ऑटोमोबाईल क्षेत्रात 15 हजार कोटी गुंतवणुकीचा सामंजस्य करार करून आपल्या पुढील योजनेविषयी महत्वाची घोषणाही केली आहे. या गुंतवणुकीतून भारत आणि जागतिक बाजारासाठी नेक्स्ट जनरेशन इलेक्ट्रिक व्हेईकल आणि ट्रॅक्टरचे नागपुरात उत्पादन होणार आहे. या प्रकल्पासाठी जागा निश्चितच करण्यात येणार आहे. कंपनीने छत्रपती संभाजीनगर येथे पुरवठा केंद्र तर नाशिक येथे विस्तार केंद्र उघडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पुणे शहरानंतर राज्यात आता नागपूर,नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल परिसंस्था निर्माण होणार आहे.
एन मोटिव्ह जर्मनी कंपनीसोबत प्रथमच गीगा कास्टिंग तंत्रज्ञानाधारित तीन चाकी इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात 10 हजार कोटींचा करार झाला आहे. भविष्यात 2500 कोटींच्या गुंतवणुकीतून याचा विस्तार होणार असून 80 टक्के उत्पादनाची निर्यात होऊन 6 हजार प्रत्यक्ष व 10 हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्याच्या समतोल विकासासाठी उद्योग धोरण आखण्यात आले असून ज्या भागात उद्योग नाहीत अशा भागांचाही विकास साधला जाणार आहे. यासाठी राज्यात मॅग्नेट औद्योगिक क्षेत्र तयार करण्यात येत आहेत. विदर्भातही नागपूर आणि अमरावती असे मॅग्नेट तयार करण्यात आले आहेत. नागपूर मॅग्नेटद्वारे गडचिरोली,भंडारा,चंद्रपूर आणि नागपूर या जिल्हयांचा औद्योगिक विकास करण्यात येत आहे.
हेही वाचा: खूशखबर: इलेक्ट्रिक वाहने होणार स्वस्त, अर्थसंकल्पात मोठी घोषणा
