जेएनएन, नागपूर: नागपूर शहरात बुधवारी रात्री कडबी चौकात व्यापाऱ्यावर धाडसी हल्ला झाला. फिल्मी स्टाईलने दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी व्यापाऱ्यावर गोळीबार करून जवळची रक्कम लुटून नेली. या घटनेत व्यापारी राजू दिपानी गंभीर जखमी झाले. राजू यांना तातडीने मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

आरोपींने सलग तीन गोळ्या झाडल्या

माहितीनुसार, दिपानी हे कार्यालयातून घरी जात असताना कडबी चौकाजवळील ‘बाबा’ नावाच्या व्यक्तीच्या घरासमोर ही घटना घडली. आरोपींनी दिपानी यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. हातात स्प्रे असल्याचे दिसताच दिपानी निघण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, त्याचवेळी  एका आरोपींने सलग तीन गोळ्या झाडल्या. पाठीला गोळी लागल्याने दिपानी खाली पडले आणि आरोपींनी त्यांच्याकडील पैशांची बॅग हिसकावून घेतली.

50 लाख रोख लंपास

या बॅगेत तब्बल 50 लाख इतकी रोकड होती अशी माहिती समोर आली आहे. ही रक्कम ‘हवाल्या’शी संबंधित असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. सुरुवातीला व्यापाऱ्याने रक्कम कमी असल्याचे सांगितले, मात्र नंतर 50 लाख रोख रक्कम असल्याचे सांगितले.

घटनेनंतर जरीपटका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.संबंधित घटनेची सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी बोलावण्यात आले होते. तीन गोळ्यांच्या खोलक्या जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींचा शोध सुरू असून हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा संशय  पोलिसांनी व्यक्त केला आहे.