जेएनएन, नागपूर: नागपूर मेट्रोच्या प्रवाशांपैकी तब्बल 47000 प्रवाश्यांनी 'महा कार्ड' वापरून प्रवास केला, जो आतापर्यंतचा सर्वाधिक महा कार्ड वापर असून एक विक्रमी नोंद ठरली आहे. यासह महा मेट्रो नागपूरने एका दिवसातील सर्वाधिक महा कार्ड वापराचे नवे शिखर गाठले आहे.

या विक्रमी वापरासोबतच डिजिटल व्यवहारांचा टक्का 57% पर्यंत पोहोचला असून, काल एकूण 119072 मेट्रो प्रवासी पैकी सुमारे 68500 प्रवाश्यांनी विविध डिजिटल माध्यमांचा वापर करून तिकीट काढले. यामध्ये सुमारे 9000 व्हॉट्सॲप तिकीट वापरकर्ते आणि 14500 यूपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) वापरकर्त्यांचा समावेश आहे.

या घडामोडी 'डिजिटल इंडिया'च्या दिशेने महा मेट्रोने घेतलेल्या सकारात्मक पावलांचे प्रतिक आहेत आणि नागपूरकर प्रवाश्यांमध्ये रोखरहित व सुलभ प्रवास पद्धती स्वीकारण्याची वाढती प्रवृत्ती दर्शवीत आहे. महा कार्ड व डिजिटल पेमेंटचा वाढता वापर तसेच नागपूर मेट्रोवरील विश्वास व प्रवास सुलभतेचा पुरावा आहे.

ही उपलब्धी महा मेट्रोच्या सुरक्षित, विश्वासार्ह व तंत्रज्ञानाधित सार्वजनिक परिवहन सेवा देण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते. शिवाय, एकूण तिकीट महसूलपैकी 50% पेक्षा अधिक डिजिटल पेमेंटचे हे संकेत आहेत की, नागपूरकर प्रवासी आता जलद, सोपा व रोखरहित व्यवहार स्वीकारण्यास तयार आहेत.