जेएनएन, नागपूर: राज्यातील ओबीसी समाज आज नागपूरमध्ये भव्य महामोर्चा काढत आहे. काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. 2 सप्टेंबर 2025 रोजी राज्य सरकारने जारी केलेला शासन निर्णय (GR) रद्द करण्याची मुख्य मागणी करण्यात येत आहे. मोर्चा यशवंत स्टेडियम येथून सुरू होऊन संविधान चौक येथे संपणार आहे. मोर्चात विदर्भासह राज्यभरातील विविध ओबीसी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.
ओबीसी समाजाच्या मते, 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयामुळे मराठा समाजातील काही व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणाच्या लाभात सामावून घेण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर परिणाम होईल, असा आरोप केला आहे. विजय वडेट्टीवार यांनी म्हणाले की, “सरकारने ओबीसींचा हक्क अबाधित ठेवत, मराठा समाजासाठी वेगळा मार्ग शोधावा. परंतु, विद्यमान जीआरमुळे ओबीसी समाजावर अन्याय होतोय, म्हणून तो त्वरित मागे घ्यावा.”
या आंदोलनाला राज्यातील विविध ओबीसी संघटना, सामाजिक कार्यकर्ते, आणि शैक्षणिक क्षेत्रातील नेते पाठिंबा देत आहेत. मोर्चा पूर्णपणे शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हेही वाचा: Mumbai Metro Line-3: दक्षिण मुंबईहून एअरपोर्टपर्यंतचा प्रवास काही मिनिटांत; जाणून घ्या Aqua Line चा संपूर्ण मार्ग, वेळापत्रक व प्रवासभाडे