जेएनएन, नागपूर: धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्यासाठी नागपूर महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली असून, दीक्षाभूमी येथे येणाऱ्या लाखो बौद्ध अनुयायांसाठी नागरी सुविधा, स्वच्छता, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त 18 ते 21 ऑक्टोबरदरम्यान विविध राज्यांतून मोठ्या संख्येने अनुयायी नागपुरात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीसह पीकेव्ही, कुर्वेज हायस्कूल, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि अन्य ठिकाणी करण्यात आलेल्या व्यवस्थांचा आयुक्तांनी आढावा घेतला. संपूर्ण परिसरात स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासोबतच अनुयायांना आवश्यक नागरी सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
अनुयायांच्या निवासासाठी 21 वॉटरप्रूफ डोम
बाहेरगावाहून येणाऱ्या अनुयायांच्या निवासासाठी शहरातील विविध भागांत एकूण 21 वॉटरप्रूफ डोम उभारण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासन आणि सामाजिक न्याय व सहाय्य विभागाच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या या डोममध्ये प्रत्येकी सुमारे एक हजार व्यक्तींच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
दीक्षाभूमी परिसरात पाच, पीकेव्हीच्या पदव्युत्तर वसतिगृह परिसरात सहा, तर कुर्वेज हायस्कूलमध्ये चार डोम उभारण्यात आले आहेत. याशिवाय शासकीय आयटीआय भवन, जिल्हा मलेरिया कार्यालय, उंटखाना, अंबाझरी, बेझनबाग आणि ड्रॅगन पॅलेस येथे प्रत्येकी एक डोम उभारण्यात आला आहे. सामाजिक न्याय व सहाय्य विभाग तसेच विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच्या इमारतीच्या तळमजल्यावरही अनुयायांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
1235 तात्पुरती स्वच्छतागृहे
अनुयायांच्या निवासाच्या ठिकाणांजवळ आणि परिसरातील विविध भागांत मनपातर्फे एकूण 1235 तात्पुरती स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. प्रत्येक स्वच्छतागृहाजवळ हात-पाय धुण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. स्वच्छतागृहांमध्ये नियमित स्वच्छता राखण्यासोबतच हँडवॉश, पाणी आणि अखंडित वीजपुरवठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
याशिवाय दीक्षाभूमी स्तूप परिसरासह सर्व प्रमुख मार्गांवर आणि स्वच्छतागृहांच्या ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेता कायमस्वरूपी स्वच्छतागृहांची उभारणी करण्याचाही मनपाचा प्रयत्न असल्याचे आयुक्त डॉ. विपीन यांनी सांगितले.
120 ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा
अनुयायांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे, यासाठी क्रिपलानी चौक ते लक्ष्मीनगर चौक आणि दीक्षाभूमी चौक ते काचीपुरा चौक या मार्गांवर मनपातर्फे 120 नळांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच परिसरातील विविध ठिकाणी पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अंबाझरी तलावाकडे सकाळी स्नानासाठी जाणाऱ्या अनुयायांची संख्या लक्षात घेऊन तलावाच्या पायथ्याशी उत्तर आणि दक्षिण दिशेला, तसेच आयटीआय आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परिसरात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्नानगृहे उभारण्यात येत आहेत. या प्रत्येक ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी प्रत्येकी 50 स्नानगृहांची व्यवस्था केली जाणार आहे.
24 तास वैद्यकीय सेवा आणि स्वच्छता
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कालावधीत अनुयायांना आरोग्यविषयक मदत तातडीने मिळावी, यासाठी मनपातर्फे 24तास वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. काचीपुरा पोलीस चौकीसह अन्य महत्त्वाच्या ठिकाणी आरोग्य सेवा पथके तैनात राहतील. गर्दीच्या ठिकाणी आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे.
दीक्षाभूमी परिसरात स्वच्छता राखण्यासाठी मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत २४ तास सफाई कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. अनुयायांच्या सोयीसाठी महानगरपालिकेच्या शाळाही खुल्या ठेवण्यात येणार आहेत.
दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस बससेवा
अनुयायांच्या वाहतुकीसाठी मनपाच्या 'आपली बस' सेवेमार्फत दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेसदरम्यान बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या बससेवेची माहिती काचीपुरा पोलीस चौकीजवळ उपलब्ध करून दिली जाणार आहे, जेणेकरून अनुयायांना प्रवासाचे नियोजन करणे सोयीचे होईल.
सर्व नागरी सुविधांची कामे अंतिम टप्प्यात असून, पुढील दोन दिवसांत व्यवस्था पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे आयुक्त डॉ. विपीन यांनी सांगितले. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुविधायुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका आणि संबंधित प्रशासन समन्वयाने काम करत आहे.
