जेएनएन, नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या (मनपा) २० ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ची अर्धवट ध्वनीफीत वाजविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापौर निता ठाकरे यांनी मनपा आयुक्त डॉ. विपीन यांना तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकारासाठी जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
मनपाच्या सर्वसाधारण किंवा विशेष बैठकीची सुरुवात ‘वंदे मातरम्’च्या गायनाने करण्याची परंपरा आहे. मात्र, २० ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला ‘वंदे मातरम्’ची केवळ पहिली दोन कडवी असलेली ध्वनीफीत वाजविण्यात आली. त्यामुळे महापौरांनी या प्रकाराबाबत आयुक्तांचे लक्ष वेधले.
जबाबदारांवर कारवाईचे निर्देश
राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ला स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे स्थान राहिले आहे. त्यामुळे त्याचा योग्य सन्मान आणि आदर राखणे अपेक्षित असल्याचे महापौरांनी नमूद केले. मनपाच्या सर्वसाधारण सभेत अर्धवट ध्वनीफीत वाजविणे ही बाब योग्य नसून, या हलगर्जीपणासाठी जबाबदार असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
पुढे असा प्रकार टाळण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करणार
यापुढे ‘वंदे मातरम्’च्या गायनात किंवा ध्वनीफितीच्या वापरात कोणतीही त्रुटी होऊ नये, यासाठी स्पष्ट कार्यपद्धती निश्चित करण्याचे निर्देशही महापौर निता ठाकरे यांनी आयुक्तांना दिले आहेत. मनपाच्या सर्वसाधारण तसेच विशेष बैठकीच्या सुरुवातीला ‘वंदे मातरम्’ योग्य पद्धतीने सादर होईल, याची दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर अर्धवट ध्वनीफीत नेमकी कोणत्या कारणामुळे वाजविण्यात आली आणि त्यासाठी कोण जबाबदार आहे, हे स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा: काँग्रेसला कोंडीत पकडताना भाजपच्या बालेकिल्ल्यातच 'खेळ', नागपूर पालिकेत वंदे मातरमचे 2 कडवे गायल्यावरून वाद
