जेएनएन, चंद्रपूर. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपाला चंद्रपुरात मोठा झटका बसला आहे. येथील वरोरा (जिल्हा चंद्रपूर) नगर परिषदेचे चे माजी नगराध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा सचिव तसेच भाजप अल्पसंख्यक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अहेतेशाम अली यांनी आपल्या समर्थकांसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळही उपस्थित होते.
भाजपा तालुकाध्यक्षांचाही पक्षप्रवेश
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी 21000 पेक्षा जास्त मते घेऊन त्यांनी आपल्या जनाधाराची चुणूक दाखवली होती. त्यांनी पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन व त्यांच्या कार्याने प्रभावीत होऊन चंद्रपूर लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वात अहेतेशाम अली यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून लोकशाही वाचविण्याच्या या लढाईत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष तूळशीराम श्रीरामे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
चंद्रपुरात काँग्रेसला होणार फायदा
या प्रवेशाने वरोरा-भद्रावती सह चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला फायदा होणार असून खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे हात अधिक बळकट होणार असल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.