जेएनएन, नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 05 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला वरिष्ठ समाजवादी नेत्या आणि आंबेडकरी विचारांच्या पुरस्कर्त्या कमलताई गवई उपस्थित राहणार की नाही, यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चेला उधाण आले होते. या संदर्भात स्वतः कमलताई गवई यांनी एका पत्राद्वारे स्पष्ट भूमिका मांडली आहे.

सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या आई डॉ. कमल गवई यांनी 5 ऑक्टोबर 2025 रोजी अमरावती येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी आणि त्यांच्या दिवंगत पतीवर केलेल्या चुकीच्या टिप्पण्यांबद्दल दुःख व्यक्त केले आणि सांगितले की त्यांचे जीवन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणी आणि विपश्यना चळवळीसाठी समर्पित आहे. डॉ. गवई यांनी जोर देऊन सांगितले की जरी त्या अशा व्यासपीठावर उपस्थित राहिल्या असत्या तरी त्या फक्त आंबेडकरांच्या विचारांवर आणि संवैधानिक मूल्यांवरच बोलल्या असत्या. आजारपणामुळे आणि वैद्यकीय सल्ल्यामुळे त्यांनी कार्यक्रमातून अनुपस्थित राहिल्याचे स्पष्ट केले.

गवई यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, "माझ्या ओळखीतल्या काही लोकांनी कार्यक्रमाची तारीख घेण्यासाठी माझ्याकडे येऊन भेट दिली होती. आमचा स्वभाव सर्वांप्रती मंगलभावना बाळगण्याचा आहे. त्यामुळे कोणत्याही विचारधारेच्या लोकांचे आम्ही स्वागत करतो. मात्र, या कार्यक्रमाच्या वृत्तानंतर माझ्यावरच नव्हे तर स्मृतिशेष दादासाहेब गवई यांच्यावरही अन्यायकारक टीका व दोषारोप सुरू झाले."

त्या पुढे म्हणतात की, "दादासाहेब गवई यांनी आयुष्यभर आंबेडकरी चळवळीला वाहून घेतले. त्यांचे जीवन कार्य हाच त्याचा पुरावा आहे. ते विरोधी मंचावर जाऊनही वंचितांचे प्रश्न मांडत असत. त्यांना हे करण्यासाठी सिंहाचे धाडस लागायचे. संघाच्या व्यासपीठावर ते गेले पण हिंदुत्व त्यांनी कधीही स्वीकारले नाही. ते नेहमी समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यावरच भाषण करत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आणि संविधानिक मूल्यांचे विचार त्यांनीच मांडले."

गवई यांनी स्पष्ट केले की, "मी त्या मंचावर गेले असते तरी आंबेडकरी विचार व विपश्यना हाच माझा केंद्रबिंदू राहिला असता. हा आमच्या संस्काराचा भाग आहे. स्मृतिशेष दादासाहेब गवई यांनीदेखील कधीही आंबेडकरी विचारांचा त्याग केला नव्हता."

अलीकडे झालेल्या टीकेबद्दल त्यांनी खंत व्यक्त करताना म्हटले की, "या एका कार्यक्रमामुळे माझ्यावर आणि दादासाहेबांवर वस्तुस्थितीला धरून नसलेली टीका केली जात आहे. माझे जीवन आंबेडकरी चळवळीला आणि विपश्यनेला वाहिलेले आहे. या चळवळीला कलंक लावण्याचा प्रयत्न पाहून मी व्यथित झाले आहे."

आपल्या प्रकृतीबद्दल सांगताना गवई म्हणाल्या की, "माझे वय 84 आहे. प्रकृती बरी नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने सध्या उपचार सुरू आहेत. त्यामुळे कुठेतरी थांबणे आवश्यक आहे. याच कारणामुळे मी 05 ऑक्टोबरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही." या स्पष्टिकरणानंतर त्यांच्या उपस्थितीवर सुरू असलेली चर्चा आता थांबण्याची शक्यता आहे.