जेएनएन, नागपूर: आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. जिल्हा परिषदांचे सर्कल नवीन रोटेशननुसार आखण्यास आव्हान देणाऱ्या चार याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुका होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे.

नागपूर, अमरावती आणि बुलढाणा येथील काही राजकीय कार्यकर्त्यांनी याचिका दाखल केली होती. राज्य सरकारने लागू केलेल्या नवीन रोटेशन पद्धतीला आव्हान दिले होते. मात्र, खंडपीठाने या याचिका गुणवत्ताहीन ठरवत फेटाळून लावले आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, जागेच्या आरक्षणाबाबत कोणीही कोणताही वैयक्तिक हक्क सांगू शकत नाही. याचिकेत मांडलेले मुद्दे केवळ काल्पनिक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

राज्य सरकारच्या वतीने सुनावणीदरम्यान राज्यघटनेतील कलम 243-ओ नुसार एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर न्यायालयाला त्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही असा युक्तिवाद मांडला होता. हा युक्तिवाद खंडपीठाने ग्राह्य  धरून सरकारचा निर्णय अवैध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:Flight Service: सोलापूरकरसाठी खुशखबर; अखेर दिवाळीआधी सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होणार!