जेएनएन, नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने यवतमाळ जिल्ह्याच्या बाभुळगाव तालुक्यातील पाचखेड येथील उत्खननातून विदर्भाचा प्रारंभिक इतिहास उलगडला आहे. विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात 3 हजार वर्षांपासून असलेल्या संस्कृतीचे संशोधन केले आहे. या पाचखेड येथील उत्खननामध्ये सापडलेल्या पुरावशेषाचे प्रदर्शन विभागात बुधवार, दि. 10 सप्टेंबर व गुरुवार, दि. 11 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन माननीय प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार यांच्या शुभहस्ते पार पडले.
विभागात आयोजित कार्यक्रमाला मानव विज्ञान शाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व विभाग प्रमुख डॉ. प्रबास साहू, डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्र-कुलगुरु डॉ. सुभाष कोंडावार यांच्यासह अतिथींनी पाचखेड येथील उत्करणात आढळून आलेल्या पुरातत्व अवशेषांची पाहणी केली त्याचप्रमाणे विस्तृत माहिती जाणून घेतली.

प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्व विभागाकडून यवतमाळ जिल्ह्यातील पाचखेड येथे 2023-24 आणि 2024-25 या दोन क्षेत्र सर्वेक्षण काळात उत्खनन करीत विदर्भाच्या प्रारंभिक इतिहासाचा खजिना लोकांसमोर आणला आहे. पाचखेड येथे आढळून आलेल्या पुरातत्व अवशेषांवरून 3 हजार वर्षांपासून लोक संस्कृती असल्याचे दिसून येते. आद्य लोहयुग ते निजाम काळापर्यंतच्या लोक संस्कृतीच्या पाऊलखुणा येथील पुरातत्व अवशेषांवरून निदर्शनास आल्या आहेत. उत्खनना दरम्यान आद्य लोह युगातील चुनाभट्टी, लोह युगातील वर्तुळाकार झोपडी, तांदूळ, बोर, जंगली बादाम, मुग डाळ, मासे, कासव, शिंपले आदी पुरातत्व अवशेष आढळले आहे.

सातवाहन काळात विविध पुरातत्व अवशेष आढळून आले असून त्यावर ब्राह्मणी लिपी आढळून आली आहे. त्यानंतर काही कालांतरातील मध्यकालीन युग आणि निजाम काळातील दगडी भिंती घराचे पुरावे आढळून आले आहे. या उत्खननात 132 विटांच्या थरांची सातवाहन कालीन विहीर देखील आढळून आली आहे.