चंद्रपूर. Chandrapur Mayor Election 2026: गेल्या काही दिवसांपासून अनेक नाट्यमय घडामोडी आणि वादविवादांमुळे चर्चेत असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये अखेर भाजपचाच महापौर बसला आहे. मंगळवारी ठाकरे गटाने भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपच्या संगीता खांडेकर या चंद्रपूरच्या महापौर झाल्या तर ठाकरे गटाचे प्रशांत दानव हे उपमहापौर झाले आहेत. यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
आज पार पडलेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर यांनी काँग्रेसच्या उमेदवार सोनाली महाडूळे यांच्यावर केवळ एका मताने मात करत बाजी मारली. एकूण 66 सदस्य संख्या असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीवेळी वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिले. तर एमआयएमच्या एका नगरसेवकाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा 32 पर्यंत खाली आला. भाजपच्या उमेदवार संगीता खांडेकर यांना 32 तर काँग्रेसच्या सोनाली महाडूळे यांना 31 मते मिळाली, काँग्रेसची महापौर पदाची संधी अवघ्या एका मताने हुकली.
चंद्रपूर महानगरपालिकेत गतवेळचा सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपचा पराभव झाला होता तर काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत सर्वात मोठा पक्ष ठरला होता. 66 जागा असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसने 27, भाजपाने 23, उद्धव ठाकरे गटाने 6, शेकापने 3, वंचितने 2, अपक्ष 2, बसपाने 1 तर शिंदे सेना आणि एमआयएमने प्रत्येकी 1-1 जागा जिंकली होती.
मात्र बहुमताचा आकडा कोणीही पार केला नसल्याने महापालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण होऊन सत्तेच्या चाव्या उद्धव ठाकरे गटाकडे आल्या होत्या. महापालिकेचा निकाल लागल्यापासून काँग्रेसमधील विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्या गटामध्ये सत्तासंघर्ष सुरू होऊन वाद विकोपाला गेला. दोन्ही गटांनी दिल्लीवारीही केली होती, मात्र त्यानंतरही त्यावर तोडगा निघाला नाही. त्यातच उद्धव ठाकरे गटाने महापौर पदाची मागणी केल्याने काँग्रेसच्या हातून सत्ता निसटली.
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पाहून उद्धव ठाकरे गटाने भाजपसोबत संगनमत करून सव्वा-सव्वा वर्षासाठी महापौरपदावर तडजोड झाली. पहिल्या सव्वा वर्षासाठी महापौरपद भाजपच्या संगीता खांडेकर यांना देण्यात आलं, तर उपमहापौरपद उद्धवसेनेला मिळालं.
ठाकरेंच्या नगरसेवकांची पक्षाशी गद्दारी?
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सांगितलं की, चंद्रपूरमध्ये जे घडलं ते परवानगीविनाच घडलेलं दिसतंय. भाजपसोबत जाण्याची पक्षाची अजिबात भूमिका नाही. भाजपसोबत गेलेल्या चंद्रपूरमधील नगरसेवकांवर कारवाई केली जाईल. यावर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी सांगितले की, मी वरून सरदेसाईंच्या संपर्कात होतो. जे होतंय त्यांना व उद्धव ठाकरेंना माहिती होतं. त्यांनी सांगितलं होतं की, पक्ष एकसंघ राहील ते पाहा. त्याचबरोबर काँग्रेससोबत जाण्याची आमची इच्छा होती, वडेट्टीवार यांच्याशी बोलणीही सुरू होती. मात्र धानोरकर गटाला आमची गरज नव्हती. त्यामुळेच आम्ही भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
