जेएनएन,कोल्हापूर: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामीण भागात सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे. पंढरपूर, कोल्हापूर, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये सकाळी मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आहे.
पंढरपूर तालुक्यात मतदानाला सुरुवात
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 8 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 16 गणांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच ग्रामीण भागातील मतदार मतदान केंद्रांबाहेर रांगा लावून आपला हक्क बजावताना दिसत आहेत. शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने मतदान प्रक्रिया सुरू असून प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कोल्हापूरमध्ये सकाळपासूनच मोठ्या रांगा
कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह असून अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीत सुरू असून पोलीस प्रशासन सतर्क आहे.
लातूरमध्ये नियमभंगाचा धक्कादायक प्रकार
लातूर जिल्ह्यातील तांबळा जिल्हा परिषद गटातील एका मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एका उमेदवाराने मतदान करतानाचा व्हिडिओ मोबाईलवर चित्रीत केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदान केंद्रात मोबाईल नेणे आणि चित्रीकरण करणे सक्त मनाई आहे. मात्र या घटनेमुळे मतदान प्रक्रियेच्या गोपनीयतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
धाराशिवमध्ये तिरंगी लढत, प्रतिष्ठेची कसोटी
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. जिल्हा परिषदेच्या 55 जागा आणि पंचायत समितीच्या 110 जागांसाठी एकूण 1308 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार असून भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
ओमराजे निंबाळकर, राणा जगजीत सिंह पाटील आणि तानाजी सावंत यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे.
हेही वाचा: Zilla Parishad Election 2026 Live: राज्यातील 12 जिल्हा परिषदांसाठी निवडणुकीला सुरवात,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क
