एजन्सी, नाशिक: नाशिक जिल्ह्यातील भावाली धरणावर एका महिला पर्यटकाचा विनयभंग झाल्याच्या आणि गुंडांच्या टोळक्याने तिच्या कुटुंबीयांवर हल्ला केल्याच्या दोन दिवसांनंतर, पोलिसांनी मंगळवारी या प्रकरणी नऊ जणांना अटक केली.

44 वर्षीय महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, रविवारी ती, तिचा पती, मुलगा, मुलगी, दीर आणि दोन भाचे धरणाजवळील धबधब्याला भेट देत असताना दोन तरुणांनी तिला पाहून शिट्टी वाजवली आणि तिची छेड काढण्यास सुरुवात केली.

जेव्हा तिच्या कुटुंबीयांनी हस्तक्षेप केला, तेव्हा समाजकंटकांनी त्यांच्यावर हल्ला केला, त्या महिलेचे कपडे फाडले आणि तिचा मोबाईल फोन हिसकावून घेतला, असा आरोप आहे. जेव्हा तिच्या पतीने मोबाईल फोन परत घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी त्याच्या गळ्यातली 20 ग्रॅम सोन्याची साखळी हिसकावून घेतली आणि त्याला मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे.

पुढे, तेथून निघताना, समाजकंटकांनी कार आणि मोटरसायकलवरून त्यांच्या एसयूव्हीचा पाठलाग केला, तिला ओव्हरटेक केले आणि त्यांचा मार्ग अडवला. हातात काठ्या, लोखंडी सळ्या आणि बेसबॉल बॅट घेतलेल्या सुमारे 9 जणांनी गाडीतून उतरून गाडीची पुढची काच फोडली आणि त्या महिलेला जबरदस्तीने बाहेर काढले, असे तक्रारीत म्हटले आहे.

गुन्हेगारांनी तिचा विनयभंग केला आणि त्यांपैकी एकाने तिच्या डोक्यावर बेसबॉल बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला, पण तिने तो वार चुकवला, असे त्या महिलेने सांगितले. 

घटनास्थळावरून निघाल्यानंतर, कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घटनेचा व्हिडिओ पोलिसांना सादर केला. 

    इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मंगळवारी नऊ जणांना अटक करण्यात आली, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

    विनयभंग, हत्येचा प्रयत्न आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले सर्वजण गिरनारे, नांदगाव साडो आणि माणिकखंब या गावांतील तसेच आसपासच्या इतर भागांतील आहेत. व्हिडिओ फुटेजमधून इतर 6-7 गुन्हेगारांचीही ओळख पटली आहे.

     "आरोपींपैकी एक असलेल्या भोईरवर 2020-21 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल होता," अशी माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली. पुढील तपास सुरू आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.

    हेही वाचा - Nashik News: छळाला प्रतिकार केल्याने कुटुंबाचा टोळक्यांकडून 15 किमीपर्यंत पाठलाग; मारहाण, गाडीची तोडफोड