मुंबई. महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार गटातील नेत्यांच्या वाढत्या भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.खासदार पार्थ पवार यांनी सलग दुसऱ्या दिवशी शरद पवार यांची भेट घेतल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
पार्थ पवार यांनी मुंबईतील सिल्व्हर ओक येथे शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले. दुपारच्या सुमारास झालेली ही भेट जवळपास दीड तास चालली होती. यापूर्वीही त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे पवार कुटुंबातील सदस्यांच्या या सलग भेटी केवळ कौटुंबिक स्वरूपाच्या आहेत की त्यामागे काही राजकीय समीकरणे जुळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे.
विलीनीकरण झाले तर मोदींचे नेतृत्व मान्य करावे लागणार?
या संपूर्ण घडामोडींमध्ये अजित पवार गटातील नेत्यांनी उपस्थित केलेला एक प्रश्न विशेष चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी शरद पवार यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत महत्त्वाचा सवाल उपस्थित केला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण झाले, तर शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार आहेत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
विलीनीकरणाचा प्रस्ताव केवळ दोन पक्षांच्या एकत्र येण्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर त्यानंतर पक्षाची राजकीय भूमिका काय असेल, हा देखील महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. सध्या अजित पवार गट हा भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचा भाग आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास नव्या पक्षाची भूमिका महायुतीसोबतच राहणार की शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र राजकीय वाटचाल केली जाणार, याबाबत स्पष्टता आवश्यक आहे.
विलिनीकरणानंतर नेतृत्व कुणाकडे? सुनेत्रा पवारांच्या नावाचीही चर्चा
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास पक्षाची सूत्रे कोणाकडे असतील हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहे. त्यामुळे विलीनीकरण झाले तरी सुनेत्रा पवार यांच्याकडेच पक्षाची धुरा राहावी, अशी भूमिका अजित पवार गटातील काही नेत्यांकडून मांडली जात आहे.
दुसरीकडे, शरद पवार यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव आणि पक्षावरील प्रभाव लक्षात घेता त्यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. पार्थ पवार यांच्या सलग भेटी, प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्याशी पुन्हा भेटण्याची व्यक्त केलेली तयारी आणि सुनील तटकरे यांनी यापूर्वी केलेले विलीनीकरणाबाबतचे भाष्य या सर्व घडामोडी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
