जेएनएन, मुंबई: राज्यात ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावरही उन्हाचा तडाखा कायम असून, मुंबईसह संपूर्ण कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे तापमानाचा पारा चढाच असताना दुसरीकडे राज्यातील काही भागांत वादळी वाऱ्यांसह पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पुढील चार ते पाच दिवसांत महाराष्ट्राच्या विविध भागांत विजांच्या कडकडाटासह तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांना वादळी पावसाच्या शक्यतेमुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, हा पाऊस रब्बी हंगामासाठी कितपत उपयुक्त ठरेल, याबाबत अनिश्चितता आहे.
मुंबईसह कोकणात उष्णतेचा चटका
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चटका वाढण्यासोबतच दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक उकाडा जाणवू शकतो. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तापमानात अपेक्षित घट झालेली नाही. समुद्रकिनारी असलेल्या शहरातही ऑक्टोबर हिटचा प्रभाव कायम असल्याने नागरिकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे.
भारतीय हवामान विभागाने १४ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईतील कुलाबा येथे कमाल तापमान ३६.४ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ येथे ३७.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सांताक्रूझ येथील तापमान सरासरीपेक्षा ४.१ अंशांनी अधिक होते. त्यामुळे मुंबईकरांना ऑक्टोबर महिन्यातही उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत.
यवतमाळमध्ये राज्यातील सर्वाधिक तापमान
राज्यातील अनेक शहरांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदवले जात आहे. यवतमाळ येथे ३८.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, तर कोकणातील रत्नागिरी येथे पारा ३८.१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. रत्नागिरीतील तापमान सरासरीपेक्षा तब्बल ५.७ अंशांनी अधिक होते. कोकणात दमट हवामान आणि वाढलेले तापमान यामुळे उकाड्याची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर-सोलापूरला यलो अलर्ट
उष्णतेचा तडाखा कायम असतानाच राज्याच्या काही भागांत पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. पुढील चार ते पाच दिवसांत विविध जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडू शकतो.
दक्षिण महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवसांत काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अल निनोमुळे ऑक्टोबर हिट तीव्र होणार?
अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे यंदा हवामानातील बदल अधिक जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, परतीच्या पावसाच्या स्थितीबरोबरच ऑक्टोबर महिन्यातील उष्णतेची तीव्रताही चिंतेचा विषय ठरू शकते. मात्र, अल निनोचा नेमका परिणाम किती होईल, हे प्रत्यक्ष हवामानातील बदल आणि आगामी अंदाजांवर अवलंबून असणार आहे.
हेही वाचा: Maharashtra Drought List: संकट वाढलं.. राज्यातील आणखी 40 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश, 358 पैकी 305 तालुके दुष्काळग्रस्त
