जेएनएन, मुंबई. Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसापासून दडी मारलेल्या वरुण राजाने पुन्हा जोरदार पुनरागमन केले असून अनेक जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. यामुळे बळीराजा सुखावला असून शेतीकामांना वेग आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाच्या आगमनाने बळीराजाची चिंता काहीशी मिटली आहे. राज्यात पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा दमदार पुनरागमन केले आहे. मुंबईत रिपरिप सुरू झाली असून मंगळवारीही हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावरील भागांत मुसळधार पावसाने जोर धरला असून पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. 

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट!

हवामान विभागाने कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट दिला आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भ आणि मराठवाड्याला यलो अलर्ट!

विदर्भ आणि मराठवाडा भागांत जोरदार सरी पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे याठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 22 ते 27 जुलै दरम्यान अनेक भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 24 जुलै रोजी बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे.त्यामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण आणि घाट भागांत अतिपावसाचा इशारा आहे. पाऊस दरम्यान  वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी पर्यंत जाऊ शकतो.मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला प्रशासनकडून देण्यात आला आहे.

हिंगोलीत ढगफुटी, तीन जण ओढ्याच्या पुरात अडकले -

    हिंगोलीच्या सेनेगाव तालुक्यातील बानबरडा भागात काल (सोमवार) रात्री उशिरा ढगफुटी झाली. यामुळे ओढ्याला आलेल्या पुराचे पाणी गावाजवळच्या महादेव मंदिरात शिरले. मंदिरात आश्रयाला असलेले तीन जण पुराच्या पाण्यात अडकले. त्यांनी मंदिराच्या छतावर आश्रय घेतला असून पाणी ओसरण्याची वाट पाहत आहेत.