जेएनएन, मुंबई: शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. "आमचे अर्धे आयुष्य काँग्रेसविरोधात लढण्यात गेले, मात्र काँग्रेसने कधी मातोश्रीकडे वाकड्या नजरेने पाहिले नाही. आज भाजपच शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत आहे," असा आरोप त्यांनी केला.
फुटीर खासदारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना ठाकरे म्हणाले की, त्यांच्या कुटुंबावर हल्ले होत असताना विरोधकांपैकी एकही जण ढाल बनून उभा राहिला नव्हता. गद्दारी करणाऱ्यांना मतदारांनी निवडून दिल्याबद्दल संबंधित मतदारांची जाहीर माफी मागत त्यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावरही टीका केली.
यावेळी ठाकरे यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. निवडणुका जिंकण्यासाठी सुरक्षा दलांचा वापर केला जात असल्याचा आरोप करत, "जर एवढी फौज निवडणुकांसाठी वापरता येते, तर मणिपूर किंवा पाकव्याप्त काश्मीरसाठी का नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. ते शेंडी-जानव्याचं हिंदुत्व नाही. जो भगव्यामध्ये भेद करतो, तो खरा हिंदू असू शकत नाही." तसेच भाजपच्या भूमिकेवर टीका करत त्यांनी "हे हिंदुत्व नाही, हे भोंदुत्व आहे," असा घणाघात केला.
हेही वाचा: 'ऑपरेशन टायगर'वरून ज्योती वाघमारेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल; एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाचे केले कौतुक
