एजन्सी, मुंबई. निवडणूक आयोगाच्या आत मतभेद उघडकीस आल्याच्या वृत्तांचा हवाला देत शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना तुरुंगात धाडण्याची मागणी केली. 

पत्रकार परिषदेला संबोधित करताना ठाकरे यांनी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतील गेल्या निवडणुका रद्द करून या राज्यांमध्ये बॅलेट पेपरचा वापर करून पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली. 

"ज्ञानेश कुमार यांना तात्काळ बडतर्फ करून तुरुंगात टाकले पाहिजे," असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

"ज्ञानेश कुमार यांना उघडे पाडल्याबद्दल मी निवडणूक आयुक्त (ECs) सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांचे आभार मानतो," असे ठाकरे म्हणाले. या विषयाची न्यायालयाने दखल घ्यावी, असेही ते म्हणाले. 

उद्धव म्हणाले की, दोन निवडणूक आयुक्तांनी निवडणूक संस्थेने घेतलेले सर्व "चुकीचे निर्णय" रद्द केले पाहिजेत. "देशातील लोकशाही वाचवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे," असे ते म्हणाले. 

एका प्रसिद्धी माध्यमाच्या वृत्तानुसार, एसआयआर (SIR) रोलआउट दरम्यान 10 महिन्यांत संधू आणि जोशी यांनी निवडणूक आयोगाच्या पावलांवर 14 वेळा आक्षेप घेतला होता.