मुंबईसह अनेक राज्यांमध्ये टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या उबर (Uber ) कंपनीवर गंभीर आरोप होत आहेत. काही आठवड्यांपूर्वी उबरने मुंबईत इतर शहरांच्या धर्तीवर शटल बस सेवा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत उबरच्या मोबाइल अॅपद्वारे बुकिंग करून प्रवाशांना त्यांच्या गंतव्य ठिकाणी पोहचवले जात आहे. मात्र, या सेवेबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. उबरने मुंबईत ही शटल बस सेवा (Uber Shuttle) सुरू करण्यासाठी महाराष्ट्राच्या परिवहन विभागाकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही.परवानगीशिवाय गेल्या कित्येक आठवड्यांपासून या बसेस मुंबईच्या रस्त्यांवर कशा काय धावू शकतात, असा सवाल आज विरोधकांकडून विधीमंडळात उपस्थित केला जाणार आहे.
बिनपरवाना धावणाऱ्या शटल बसबाबत तक्रार!
नवी मुंबईतील प्रवासीने सांगितले की गेल्या काही दिवसांपासून उबरच्या शटल बस नवी मुंबईतील विविध भागांमध्ये प्रवाशांना १ ते १० किमीच्या अंतरासाठी किमान ९० रुपये आकारून सेवा देत आहेत. बेलापूर ते मंत्रालयाकडे जाण्यासाठी बस बुक केली असता, त्यांनी ड्रायव्हरकडे परिवहन विभागाचा परवाना विचारला. मात्र, ड्रायव्हरने परवाना दाखवण्यास टाळाटाळ केली.
परिवहन मंत्री सरनाईक यांची प्रतिक्रिया!
मुंबईत उबरच्या शटल बस शेकड्यांमध्ये रस्त्यावर धावत असताना सरकारकडून परवानगी घेण्यात आली आहे काय? अशी विचारणा महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना केली असता, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, उबरने कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे परिवहन आयुक्तांना या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच त्यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना या बिनापरवाना शटल बसवर छापे टाकण्यास सांगितले आहे.
उबरकडून कोणताही प्रतिसाद नाही!
उबरच्या सेफ्टी ऑफिसर आकाश अग्रवाल यांना जेव्हा याबाबत विचारले गेले, तेव्हा त्यांनी काहीही उत्तर देण्यास टाळाटाळ केली. त्यांनी एवढेच सांगितले की, ते मुंबईतील त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलून या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया देतील.