जेएनएन, ठाणे. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर अवघ्या काही तासांतच शहरात राजकीय वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळालं. आझाद नगर परिसरात माजी महापौर आणि बंडखोर उमेदवाराच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचं रूपांतर थेट हाणामारीत झाल्यानं काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.

या गोंधळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी गंभीर आरोप करत ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा संशय व्यक्त केला. मतदान केंद्रावरून ईव्हीएम बाहेर नेत असताना संशयास्पद हालचाली झाल्याचा दावा त्यांनी केला. “निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नाही. काही मशीनमध्ये छेडछाड करण्यात आली असण्याची शक्यता आहे,” असा आरोप मीनाक्षी शिंदे यांनी कार्यकर्त्यांसमोर केला. 

या आरोपांनंतर दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. आधी जोरदार घोषणाबाजी झाली, त्यानंतर एकमेकांना धक्काबुक्की करत हाणामारी सुरू झाली. परिस्थिती चिघळत असल्याचं लक्षात येताच मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाला पांगवलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. 

या घटनेनंतर काही वेळासाठी आझाद नगर परिसरात तणावाचं वातावरण होतं. खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आली असून संवेदनशील भागात गस्त वाढवण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. 

दरम्यान, ईव्हीएम छेडछाडीच्या आरोपांबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. “सर्व ईव्हीएम मशीन सीलबंद असून कडेकोट सुरक्षेत ठेवण्यात आले आहेत. आरोपांची गंभीरतेने दखल घेऊन तपास केला जाईल,” असं निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - BMC Election Result 2026 Live: मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट