जेएनएन, मुंबई: राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान झाले आहे. तसेच अजूनही काही भागात पूरस्थिती आहे. त्यामुळे सन 2026-26 या वर्षीचा ऊस गाळप हंगाम राज्यात दि. 1 नोव्हेंबर 2025 पासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यासह मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन 10 रुपये कपात आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रतिटन 5 रुपये कपात करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

ऊस गाळप हंगामाचा आढावा बैठक संपन्न

याबाबत आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सन 2024-25  ऊस गाळप हंगामाचा आढावा आणि सन 2025-26 मधील नवीन गाळप हंगामाचे धोरण ठरविण्यासाठी मंत्री समितीच्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री (विदर्भ,तापी आणि कोकण विकास महामंडळ) मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे आणि साखर संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ऊसासाठी प्रति मेट्रीक टन 3 हजार 550 रुपये एफआरपी जाहीर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, यंदा गाळप होणाऱ्या ऊसासाठी प्रति मेट्रीक टन 3 हजार 550 रुपये एफआरपी तर बेसिक उताऱ्यासाठी 10.25 टक्के देण्यात येणार आहे.

गेल्या हंगामात सुमारे 200 साखर कारखान्यांनी गाळप घेतले असून यामध्ये 99 सहकारी व 101 खाजगी कारखान्यांचा समावेश होता. शेतकऱ्यांना 31 हजार 301 कोटी रुपयांची एफआरपी अदा करण्यात आली आहे.   

    राज्याने 99.06 टक्के एफआरपी अदा केली आहे. यामध्ये 100 टक्के एफआरपी केलेल्या कारखान्यांची संख्या 148 आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पात सन 2024-25 मध्ये कारखान्यांनी निर्यात केलेली वीज 298 कोटी युनिट्स असून कारखान्यांना वीज निर्यातीपासून प्राप्त उत्पन्न 1979 कोटी आहे. कारखान्यांना इथेनॉल विक्रीपासून उत्पन्न 6 हजार 378 कोटी आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

    बैठकीत ऊस तोडणीसाठी यांत्रिकीकरण आणि सहवीज निर्मिती विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी सादरीकरण केले. बैठकीपूर्वी केंद्रशासनाने घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्ताने, राज्यातील सहकार क्षेत्राची वाटचाल दर्शविणारे चित्रफितीचे  सादरीकरण करण्यात आले.