मुंबई- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. एमपीएससीच्या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष आणि विविध तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत एसआयटी चौकशीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर एसआयटी स्थापन करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.
एमपीएससीतील कथित गैरप्रकारांची चौकशी
एमपीएससीच्या गट-ब आणि गट-क मुख्य व पूर्व परीक्षा 2025, तसेच औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि यासंदर्भात उपस्थित झालेल्या अन्य तक्रारींची चौकशी करण्याचे सरकारने जाहीर केले आहे. यापूर्वी औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी तपास सुरू असून, या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात नेण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिले होते.
या पार्श्वभूमीवर आता एसआयटीकडून संबंधित प्रकरणांची चौकशी केली जाणार आहे. एमपीएससीच्या कारभारातील वादग्रस्त अधिकारी आणि पेपरफुटीशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींची भूमिकाही तपासाच्या कक्षेत येण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या काही परीक्षांबाबत तक्रारी असल्यास त्यांचीही फेरतपासणी करण्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
उत्तरपत्रिकांची फेरतपासणी, मुलाखतींवरही लक्ष
विद्यार्थ्यांच्या मागण्यांनंतर काही परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ज्या भरती प्रक्रियेबाबत गंभीर तक्रारी आहेत, त्या प्रकरणांमध्ये चौकशी पूर्ण होईपर्यंत पुढील प्रक्रिया आणि मुलाखतींबाबतही सरकारने सावध भूमिका घेतली आहे. परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समितीही स्थापन करण्यात आली आहे.
एमएच-सीईटी गैरप्रकाराचीही एसआयटी चौकशी
दरम्यान, एमएच-सीईटी परीक्षेतील कथित गैरप्रकारांच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठीही एसआयटी स्थापन करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. काही परीक्षा केंद्रांबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबंधित केंद्रांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच तक्रारींच्या आधारे एफआयआर दाखल करून संबंधित प्रकरणांचा तपास पोलीस उपायुक्त/सहपोलीस आयुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांकडून करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कथित डेटा लीकचीही फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे.
एमएच-सीईटीमधील गैरप्रकार सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणात काही विद्यार्थ्यांना मोठ्या रकमेच्या बदल्यात उच्च पर्सेंटाइल मिळवून देण्यात आल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत; या आरोपांची चौकशी एसआयटीमार्फत केली जाणार आहे.
‘एमपीएससी परीक्षा सध्या ऑनलाइन होणार नाही’
दरम्यान, एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या चर्चेवरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सध्या एमपीएससीची कोणतीही परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आधी ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला असून, सध्याची ऑफलाइन ओएमआर पद्धत सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एमपीएससी परीक्षांच्या पद्धतीबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. भविष्यात परीक्षा ऑनलाइन घ्यायच्या की नाही, याबाबतचा कोणताही निर्णय विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतरच घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल
एमपीएससी आणि एमएच-सीईटी या दोन्ही परीक्षांबाबत विद्यार्थ्यांकडून सातत्याने पारदर्शकता आणि गैरप्रकारांची चौकशी करण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर एसआयटी, फॉरेन्सिक ऑडिट, उत्तरपत्रिकांची फेरतपासणी आणि परीक्षा पद्धतीबाबत विद्यार्थ्यांशी संवाद अशा विविध पातळ्यांवर सरकारकडून पावले उचलली जात आहेत. चौकशीत नेमके कोणते गैरप्रकार आढळतात आणि त्यासाठी कोण जबाबदार ठरते, हे तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
