जेएनएन, नवी दिल्ली: खरी शिवसेना कुणाची या खटल्यावर उद्या म्हणजे 8 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत गेल्या 3 वर्षापासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाची अंतिम सुनावणी 8 ऑक्टोबरला होणार आहे, अशी माहिती वकील असीम सरोदे यांनी दिली आहे.
सुप्रीम कोर्ट निकाल देणार?
शिवसेना धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. या प्रकरणात दोन्ही सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे. या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे.
‘एकनाथ शिंदे यांचे विमान सर्वोच्च न्यायालय जमिनीवर पाडणार का’
शिवसेना धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या अंतिम सुनावणी घेणार असे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले आहे. दिनांक 8 ऑक्टोबरला न्यायाधीश सूर्यकांत नक्की सुनावणी घेतील अशी अपेक्षा आहे. इकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी बांधून तयार नसलेल्या विमानतळाचे नवी मुंबईत दिखाऊ उद्घाटन करणार आणि त्याचवेळी संविधानासोबत अनैतिकता करून सत्तेच्या हवेत असलेल्या एकनाथ शिंदे यांचे विमान सर्वोच्च न्यायालय जमिनीवर पाडणार का? लवकरच कळेल, असं वकील असीम सरोदे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
शिवसेना धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या अंतिम सुनावणी घेणार असे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले आहे. दिनांक 8 ऑक्टोम्बर ला जस्टीस सूर्यकांत नक्की सुनावणी घेतील अशी अपेक्षा आहे.
— Asim Sarode (@AsimSarode) October 7, 2025
इकडे मोदी बांधून तयार नसलेल्या विमानतळाचे नवी मुंबईत दिखाऊ उदघाटन करणार आणि त्याचवेळी संविधानासोबत अनैतिकता…
शिवसेना पक्षात उभी फूट
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने निर्णय देताना शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले होते. त्यावर सुप्रिम कोर्टात वाद सुरु आहे. यावर आता अंतिम सुनावणी होणार आहे.
धनुष्यबाण चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळणार?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यात पार पडतील. त्याआधीच खरी शिवसेना कुणाची हा निकाल सुप्रीम कोर्ट देणार आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे कायम राहणार की ते पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळणार हे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
यामुळे खटला पडला होता लांबणीवर
न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच शिवसेना चिन्ह आणि नावाचा खटला सुरू आहे. 19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या काळात राष्ट्रपती आणि राज्यपाल वादावर घटनापीठाची सुनावणी होणार होती त्यामुळे हा खटला लांबणीवर पडला होता.