जेएनएन, दिल्ली/मुंबई: शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हावरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलत 18 फेब्रुवारी ही नवी तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या महत्त्वाच्या प्रकरणाचा निकाल अजूनही प्रलंबित राहणार आहे.
एका महिन्यानंतर सुनावणी!
याआधी या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र आता ती थेट एका महिन्यानंतर होणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांनंतरच ही सुनावणी होणार असल्याने त्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावरही दिसून येण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण?
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावरून ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये वाद सुरू आहे. या प्रकरणात निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं असून, त्यावर अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे.
राजकीय हालचालींना वेग!
सुनावणी पुढे गेल्याने दोन्ही गटांकडून आपापली राजकीय बांधणी, पक्षविस्तार आणि निवडणूक तयारीवर अधिक भर दिला जाणार असल्याचं बोललं जात आहे. आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता!
शिवसेनेच्या नाव आणि चिन्हावर अंतिम निर्णय कधी होणार, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळासह शिवसैनिकांचं लक्ष लागलं आहे. आता 18 फेब्रुवारीच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष केंद्रीत होणार आहे.
