जेएनएन, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली. सुनेत्रा पवार यांच्या संभाव्य शपथविधीबाबत विचारण्यात आल्यानंतर, “त्याबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती नाही”, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या कार्यशैलीची आठवण करून देताना शरद पवार म्हणाले, “अजित पवार असते तर आजही ते फिल्डवर उतरून काम करत असते. संकट कितीही मोठं असलं तरी ते थांबत नसत.” या शब्दांतून त्यांनी अजित पवारांच्या कामकाजाविषयी भावना व्यक्त केल्या.

सुनेत्रा पवार यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर बोलताना शरद पवार यांनी संयमित भूमिका घेतली. कोणताही निर्णय घाईघाईने होणार नसून, योग्य वेळी योग्य चर्चा करूनच पुढील दिशा ठरवली जाईल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेबाबत विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, “हा विषय माध्यमांमधून नव्हे, तर नेते एकत्र बसून चर्चेतून ठरवतील.” पक्षाची भविष्यातील भूमिका, संघटनात्मक बांधणी आणि राजकीय रणनीती याबाबत अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा झाल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.

हेही वाचा: बैठकीसाठी सुनेत्रा पवार मुलांसह मुंबईत दाखल; ‘देवगिरी’ बंगल्यावर पहाटेच आगमन