जेएनएन, बारामती: बारामतीमधून एक मोठी आणि भावनिक बातमी समोर आली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मारकाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरच अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारले जाणार आहे. विशेष म्हणजे याच मैदानावर अजित पवार यांचा अंत्यविधी पार पडला होता.
अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी प्रत्यक्ष मैदानाची पाहणी केली. याआधी शरद पवार आणि जय पवार यांच्यात स्मारकासंदर्भात सविस्तर बैठक पार पडली, त्यामध्ये स्मारकाच्या ठिकाणावर अंतिम निर्णय घेण्यात आला.
बैठकीनंतर थेट मैदानावर पाहणी!
शरद पवार यांच्याशी बैठक झाल्यानंतर जय पवार यांनी तात्काळ विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाला भेट दिली. यावेळी संबंधित अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेसोबत स्मारकाच्या जागेची पाहणी करण्यात आली. स्मारकाचा प्राथमिक आराखडा (नकाशा) देखील यावेळी पाहण्यात आला असून, स्मारक कशा पद्धतीने उभारायचे याबाबत चर्चा झाली.
स्मारकाचा आराखडा तयार!
माहितीनुसार, अजित पवार यांच्या स्मारकाचा भव्य आणि सन्मानपूर्वक आराखडा तयार करण्यात आला आहे. या स्मारकातून अजित पवार यांचे सामाजिक, राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील योगदान जतन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्मारक केवळ श्रद्धास्थान न राहता, पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारे केंद्र ठरेल, ठरणार आहे.
बारामतीसाठी भावनिक क्षण!
अजित पवार यांचे बारामतीशी अतूट नाते होते. त्यामुळे त्यांच्या अंत्यविधी झालेल्याच ठिकाणी स्मारक उभारण्याचा निर्णय हा बारामतीकरांसाठी भावनिक ठरणारा आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून, लवकरच स्मारकाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.दरम्यान, स्मारकाच्या उद्घाटनाबाबत आणि पुढील टप्प्यांबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
