जेएनएन, मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकारी आणि जुन्या शिवसैनिकांचा भव्य मेळावा आज  मुंबईत पार पडणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आज  सायंकाळी 6 वाजता दादर येथील शिवाजी मंदिरात येथे होणार आहे.

‘ज्येष्ठ शिवसैनिक कक्ष’च्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून जमिनीवर राहून पक्ष मजबूत करणाऱ्या आणि दशकेभर लढत राहिलेल्या ज्येष्ठ शिवसैनिकांना सन्मान देण्यासाठी हा उपक्रम असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. शिवसेनेच्या विचारांची परंपरा, संघटनात्मक बांधणी आणि आगामी राजकीय वाटचाल या संदर्भात महत्वपूर्ण मार्गदर्शन उद्धव ठाकरे मेळाव्यातून करणार आहेत अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.

सध्याच्या राजकीय घडामोडी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, तसेच कार्यकर्त्यांनी संघटन पातळीवर दाखवायची एकजूट या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे स्पष्ट भूमिका मांडू शकतात. विशेष म्हणजे, अलीकडील राजकीय परिस्थितीमुळे शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या भावना आणि निष्ठा अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या मेळाव्याद्वारे होणार असल्याचे मानले जात आहे.

ज्येष्ठ शिवसैनिकांशी थेट संवाद, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे, तसेच भविष्यातील संघर्षाची रुपरेषा याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. या मेळाव्यामुळे परंपरागत शिवसेना कुटुंबाला पुन्हा एकत्र आणून पक्षाच्या दिशादर्शनाचा होणार आहे.उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज ज्येष्ठ शिवसैनिकांचा मेळावा;‘ज्येष्ठ शिवसैनिक कक्ष’चा द्वितीय वर्धापनदिन!