जेएनएन, मुंबई:राज्याच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे.महाविकास आघाडी (MVA) आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची भेट घेण्याच्या तयारीत आहे. शिवसेना (UBT) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे. महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे अधिकृतरीत्या भेटीसाठी वेळ मागितली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, “आम्ही आज पुन्हा निवडणूक आयोगाकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. मात्र अद्याप आयोगाने वेळ निश्चित केलेली नाही.” यामुळे मविआ नेत्यांमध्ये काहीशी प्रतीक्षा आणि उत्सुकता निर्माण झाली आहे. आयोगाशी होणाऱ्या या भेटीत निवडणुका लांबणीवर जाणे, प्रलंबित आरक्षण प्रक्रिया, विभागनिहाय मतदार यादी आणि निवडणुकीची संभाव्य वेळापत्रक यांसारखे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले जाणार आहे.

महाविकास आघाडीचे नेते गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगावर दबाव वाढवत आहेत. राज्यातील नगरपरिषदा, महापालिका तसेच पंचायत समित्या–नगर पंचायतींच्या निवडणुका प्रलंबित असल्यामुळे, राज्यात लोकशाही प्रक्रिया अडथळ्यात येत असल्याचा आरोप MVA करत आहे. आयोगाने आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा तिढा, मतदार यादी सुधारणा याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणीही MVA ने केली आहे.

“राज्य सरकार जाणूनबुजून निवडणुका टाळत आहे. जनतेपासून पळ काढणाऱ्या या सरकारला निवडणुका नको आहेत. त्यामुळे आम्ही आयोगाकडे सतत पाठपुरावा करीत आहोत.”अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. मविआची आजची संभाव्य भेट महत्त्वाची ठरणार असून, आयोगाकडून वेळ मिळाल्यास राज्याच्या आगामी निवडणूक प्रक्रियेला गती मिळेल किंवा पुन्हा एखादा तांत्रिक अडथळा उभा राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: "गाफील राहाल तर मुंबई हातातून गेली समजा"; मराठी माणसाला सतर्क राहण्याचे राज ठाकरेंचे आवाहन