जेएनएन, मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मराठी मतदारांना सजग राहण्याचे आवाहन केले आहे.मुंबई महापालिका निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठी मतदारांना थेट इशारा देणारे वक्तव्य केले आहे. मुंबईत आयोजित कोकण महोत्सवात बोलताना त्यांनी मुंबईच्या राजकारणातील बदलत्या समीकरणांवर भाष्य केले आहे. मराठी मतदारांनी निवडणुकांकडे गाफीलपणे पाहिल्यास त्याचे परिणाम अत्यंत धोकादायक ठरू शकतात.

राज ठाकरे म्हणाले, “मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आपण गाफील राहिलो, तर मराठी माणसासाठी ही शेवटची निवडणूक ठरू शकते. रात्र वै-याची आहे… सावध राहा.” यासोबतच त्यांनी नाव न घेता सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधत म्हटले की, “जर एकदा मुंबई आपल्या हातातून गेली, तर पुन्हा आपल्याला काहीच करता येणार नाही. मग हे लोक अक्षरशः थैमान घालतील.”

त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यापूर्वीही राज ठाकरे यांनी मुंबईतील बदलत्या लोकसंख्याशास्त्राचा मुद्दा सातत्याने  उपस्थित करत मुंबईची अस्मिता आणि मराठी माणसाचा सन्मान  यावर अधिक भर दिला आहे. आगामी निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापू लागले असताना त्यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.

मनसे प्रमुखांनी मराठी मतदारांनी एकजूट दाखवून योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंती केली. त्यांनी सूचकपणे आरोप केला की, मुंबईतील काही शक्ती जाणूनबुजून मराठी माणसाला बाजूला करण्याचा काम करून राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक मराठी मत निर्णायक ठरणार असल्याचे  राज ठाकरे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, भाजप, शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातही मुंबई महापालिकेवर कब्जा मिळवण्यासाठी सखोल रणनीती आखली जात आहे. त्यातच राज ठाकरे यांचे विधान राजकीय चर्चेला नवा वेग देणारे ठरत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी ओळख, विकास आणि सत्तासंघर्ष यांचा त्रिकोण पुन्हा एकदा केंद्रस्थानी असल्याचे चित्र दिसू लागले आहे.