जेएनएन, मुंबई: दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आज 19 सप्टेंबर रोजी मातोश्रीबाहेर राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. दिशा सालियनचे वडील सतीश सालियान हे आपल्या वकिलांसह शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांना मानहानीची नोटीस देण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले. मात्र, सतीश सालियान मातोश्रीच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यापूर्वीच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी नोटीस स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे.
सतीश सालियान यांनी यापूर्वी आदित्य ठाकरे ५०० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस बजावली आहे. या नोटिशीत संबंधित वक्तव्यांबाबत बिनशर्त सार्वजनिक माफी मागावी, वक्तव्य मागे घ्यावे आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
प्रवेशद्वारावरच स्वीकारली नोटीस
सतीश सालियान वकिलांसह मातोश्रीवर येणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरात शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी सतीश सालियान यांनी माध्यमांशी संवाद साधला. मातोश्रीकडे जात असताना प्रवेशद्वारावर आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी सतीश सालियान यांच्याकडील नोटीस स्वीकारली. त्यामुळे सतीश सालियान यांना प्रत्यक्ष मातोश्रीच्या आत जाऊन नोटीस देण्याची आवश्यकता राहिली नाही.
नेमकं प्रकरण काय?
दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून गेल्या काही वर्षांपासून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दिशा सालियन यांचा ८ जून २०२० रोजी मुंबईतील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन यांच्याशी आपली कोणतीही ओळख नसल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरे यांच्या काही वक्तव्यांवर आक्षेप घेत मानहानीची कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. आता सात दिवसांच्या मुदतीत संबंधितांकडून काय उत्तर दिले जाते, याकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: दिशा सालियन प्रकरणात नवा ट्विस्ट; वडील आज जाणार मातोश्रीवर, नेमकं काय आहे कारण…? वाचा सविस्तर
