जेएनएन, मुंबई: दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला पुन्हा एकदा वेग आला असून, या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी शिवसेना (UBT) आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या तात्काळ अटकेची मागणी CBI कडे केली आहे. त्यांनी या प्रकरणात कथित बलात्कार, हत्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणीही केली आहे. ही मागणी सतीश सालियन यांनी CBI ला पत्राद्वारे केल्याची माहिती आहे.
दरम्यान, आज 19 सप्टेंबर रोजी सतीश सालियन आपल्या कायदेशीर पथकासह मुंबईतील मातोश्री निवासस्थानी जाणार आहेत. आदित्य ठाकरे यांना नव्याने मानहानीची नोटीस बजावण्यासाठी ते दुपारी 4 वाजता मातोश्रीवर जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या भेटीदरम्यान सुरक्षेचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी मुंबई पोलिसांकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर CBI तपासाला सुरुवात
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने 2 सप्टेंबर 2026 रोजी महत्त्वाचा आदेश देत CBI कडून नव्याने तपास करण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाने CBI ला दिशा सालियन यांच्या वडिलांचा जबाब नोंदवून FIR दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर CBI च्या स्पेशल क्राइम ब्रँचकडून 13 सप्टेंबर रोजी FIR दाखल करण्यात आली.
मात्र, या आदेशातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तपासात पुरेसे ठोस साहित्य समोर येईपर्यंत कोणत्याही व्यक्तीला आरोपी म्हणून वागणूक देऊ नये, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे FIR मध्ये नाव असणे आणि एखादी व्यक्ती कायदेशीरदृष्ट्या आरोपी ठरणे या दोन बाबी वेगळ्या आहेत, असे कोर्टाने नमूद केले आहे.
