जेएनएन, बीड. Beed Sarpanch Murder Case: बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.
बीड जिल्ह्यातील एका पवनचक्की कंपनीकडे पैशांची मागणी करणाऱ्या काही व्यक्तींनी खंडणीच्या बोलीला विरोध केल्याच्या आरोपावरून मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh) यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करुन त्यांच्यावर अत्याचार करुन त्यांची निर्घृण हत्या केली होती.
या प्रकरणात आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध असलेले वाल्मिक कराड यांच्यावरही याप्रकरणात कारवाई सुरु आहे. त्यामुळे विरोधाकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
आता सरकारनं ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी तशी मागणी केली होती. त्यावर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणात धनंजय देशमुख यांनी पोलिसांवर योग्य तपास करत नसल्याचा आरोप करत अन्नत्याग आंदोलन केलं होतं.
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. pic.twitter.com/CkHIgGNneF
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 26, 2025