मुंबई - रविवारी खेळल्या गेलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यावरून वाद आणि राजकारण चांगलेच रंगले आहे. शिवसेनेचे (यूबीटी) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दावा केला की, रविवारी खेळल्या गेलेल्या भारत-पाकिस्तान आशिया कप क्रिकेट सामन्यावर 1.5 लाख कोटी रुपयांचा सट्टा लागला होता. ज्यापैकी 50,000 कोटी रुपये पाकिस्तानला गेले आहेत. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, भारत-पाकिस्तान सामन्यातून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (Pakistan Cricket Board)  1,000 कोटी रुपये मिळाले आणि हे पैसे आमच्याविरुद्ध वापरले जातील.

राऊत पुढे म्हणाले, कालच्या सामन्यात 1.5 लाख कोटींचा जुगार झाला ज्यापैकी 50,000 कोटी रुपये पाकिस्तानला गेले. हे पैसे आमच्याविरुद्ध वापरले जातील. सरकार किंवा बीसीसीआयला हे माहित नाही का?  पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला 1000 कोटी मिळाले. एकीकडे केंद्र सरकार आयएमएफ आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेला सांगते की, पाकिस्तानला कर्ज देऊ नका, ते पैसे दहशतवादी कारवायांमध्ये वापरले जातील. पण काल भारताच्या मदतीने पाकिस्तानला मिळालेल्या पैशांचे काय? असा सवालही संजय राऊत यांनी केला. त्यांनी म्हटले की, अमित शहांचा मुलगा जय शहा यांच्याकडून हे पैसे पाकिस्तानला दिले आहेत.

हस्तांदोलन नाकारणे हा निव्वळ विनोद -

भारताचा सात विकेटने विजय झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन नाकारले, सपोर्ट स्टाफच्या एका महत्त्वाच्या सदस्याने सामूहिक निर्णयाला मान्यता दिली आणि बीसीसीआयनेही त्याला मान्यता दिली. संजय राऊत यांनी याला विनोद असल्याचे म्हटले.

शिवसेना ठाकरे गटाचा या सामन्याला विरोध होता. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि त्यानंतर 7 मे रोजी सीमेपलीकडे असलेल्या दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर दोन्ही देशांमधील वाढलेल्या भू-राजकीय तणावादरम्यान बहिष्काराच्या आवाहनानंतरही हा सामना खेळवण्यात आला.