डिजिटल डेस्क, मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. परीक्षेत सातवा क्रमांक मिळवणाऱ्या उमेदवार रुतुजा पाटील हिला नंदुरबार येथून अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर प्रकरणातील आरोपींची संख्या सात झाली आहे.

मुंबई क्राईम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच रुतुजा पाटीलला कथितरीत्या फुटलेली प्रश्नपत्रिका मिळाली होती. मात्र, परीक्षेत तिच्यावर संशय येऊ नये यासाठी तिला १० प्रश्नांची उत्तरे जाणीवपूर्वक चुकीची देण्यास सांगण्यात आले होते, असा पोलिसांचा दावा आहे.

अचानक गुणवत्ता यादीत उच्च क्रमांक मिळाल्यास संशय निर्माण होऊ शकतो, त्यामुळे ठरावीक प्रश्नांची उत्तरे चुकीची देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अटकेनंतर पोलिसांनी रुतुजा पाटीलला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिची रवानगी गुन्हे शाखेच्या कोठडीत केली आहे.

MPSC अधिकाऱ्यांसह कोचिंग अकादमीच्या संचालकांना अटक
या प्रकरणात यापूर्वी गुन्हे शाखेने एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये एमपीएससीचे सहायक विभाग अधिकारी विश्वेश्वर दत्तात्रेय नकाते, गोपाल भट्टू मराठे आणि अवर सचिव अभिजीत गणपतराव लेंडवे यांचा समावेश आहे.

याशिवाय कौटिल्य अकादमीचे संचालक प्रवीण दिलीप पाटील, कथित सूत्रधार अमृत नामदेव पाटील आणि लोकेश उर्फ गौरव राजेंद्र पाटील यांनाही यापूर्वी अटक करण्यात आली आहे.

तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपींनी परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांपर्यंत अनधिकृतपणे प्रवेश मिळवला. त्यानंतर प्रश्नांचा स्वतंत्र संच तयार करून पैशांच्या मोबदल्यात तो काही उमेदवारांपर्यंत पोहोचवण्यात आल्याचा आरोप आहे.

    MPSC ने रद्द केली संपूर्ण भरती प्रक्रिया
    ड्रग इन्स्पेक्टर पदासाठीची चाळणी परीक्षा २२ मार्च रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांवर घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल १२ जून रोजी जाहीर झाला. त्यानंतर १ ते २२ जुलैदरम्यान ४८८ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली.

    मात्र, २२ ते २६ जुलैदरम्यान काही उमेदवार आणि लोकप्रतिनिधींनी परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित झाल्याच्या तक्रारी केल्या. प्राथमिक तपासात प्रश्नपत्रिकेच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचे समोर आल्यानंतर MPSC ने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. आयोगाने लवकरच नव्याने परीक्षा घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

    गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल
    या प्रकरणात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर फसवणूक, गुन्हेगारी कट, गुन्हेगारी विश्वासभंग आणि भ्रष्टाचारासह विविध आरोप ठेवण्यात आले आहेत.

    रुतुजा पाटीलच्या अटकेनंतर पेपर लीक प्रकरणातील आर्थिक व्यवहार, प्रश्नपत्रिका उमेदवारांपर्यंत कशी पोहोचली आणि या संपूर्ण गैरव्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

    हेही वाचा:Mumbaicha Raja 2026 First look: मुंबईच्या राजाचा ‘या’ दिवशी येणार फर्स्ट लुक समोर; जाणून घ्या तारीख, ठिकाण, वेळ आणि महत्त्वाची माहिती