जेएनएन, नवी दिल्ली: देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी राजधानी नवी दिल्ली सज्ज झाली आहे. राष्ट्रीय गीत *‘वंदे मातरम्’*ला 150 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा विशेष आणि ऐतिहासिक ठरणार आहे. कर्तव्यपथावर होणाऱ्या भव्य संचलनात भारताच्या लष्करी सामर्थ्यासोबतच समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडणार असून, महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा विशेष आकर्षण ठरणार आहे.
संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी सोहळ्याच्या तयारीची अधिकृत माहिती दिली. यंदाच्या प्रजासत्ताक दिन समारंभासाठी युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत भारताची सामरिक ताकद, स्वदेशी संरक्षण क्षमता आणि सांस्कृतिक वैभव जगासमोर मांडले जाईल.
महाराष्ट्राचा चित्ररथ ठरणार केंद्रबिंदू
यंदाच्या संचलनात सहभागी होणाऱ्या एकूण 30 चित्ररथांमध्ये महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवरील चित्ररथ विशेष लक्ष वेधून घेणार आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून रुजवलेली सामाजिक एकात्मतेची चळवळ आज आधुनिक भारताच्या ‘आत्मनिर्भरते’चा कसा पाया ठरते, याचे प्रभावी चित्रण या चित्ररथातून सादर केले जाणार आहे.
गणेशोत्सवामुळे निर्माण होणारी कोट्यवधींची आर्थिक उलाढाल, मूर्तिकार, सजावट कलाकार, कारागीर आणि विविध घटकांना मिळणारा रोजगार यांमधून उभी राहिलेली आर्थिक साखळी या चित्ररथात ठळकपणे मांडली जाईल. महाराष्ट्राची ओळख असलेली ढोल-ताशा पथके आणि सामाजिक सलोखा यांतून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चा संदेश दिला जाणार आहे.
लष्करी सामर्थ्याचे भव्य प्रदर्शन
लष्करी ताकदीच्या प्रदर्शनात यंदा प्रथमच ‘बॅटल ॲरे’ (Battle Array) ही युद्धरचना सादर केली जाणार आहे. अर्जुन टँक, टी-90 भीष्म, राफेल विमाने तसेच स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे चित्तथरारक दर्शन या संचलनात घडणार आहे. यामध्ये 18 लष्करी तुकड्या, 13 बँड्स आणि एकूण 30 चित्ररथ सहभागी होणार आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रम आणि जनभागीदारी
सुमारे 2,500 कलाकारांच्या सांस्कृतिक सादरीकरणाला ऑस्कर विजेते संगीतकार एम.एम. कीरावानी यांचे संगीत आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा भारदस्त आवाज लाभणार आहे. यंदाचा सोहळा ‘जनभागीदारी’ या संकल्पनेवर आधारित असून, 10,000 विशेष पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. यात इस्रोचे शास्त्रज्ञ, लखपती दीदी आणि प्रगत शेतकऱ्यांचा समावेश आहे.
नागरिकांसाठी विशेष सुविधा
नागरिकांच्या सोयीसाठी ‘राष्ट्रपर्व’ हे विशेष पोर्टल आणि मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. तिकीटधारकांसाठी दिल्ली मेट्रोचा प्रवास मोफत ठेवण्यात आला आहे. तसेच, 26 ते 31जानेवारीदरम्यान लाल किल्ल्यावर ‘भारत पर्व’चे आयोजन करण्यात येणार असून, येथेही महाराष्ट्रासह विविध राज्यांच्या संस्कृतीचा आस्वाद घेण्याची संधी देशवासियांना मिळणार आहे.
एकूणच, ७७ वा प्रजासत्ताक दिन सोहळा भारताच्या सामर्थ्य, संस्कृती आणि आत्मनिर्भरतेचे भव्य दर्शन घडवणारा ठरणार आहे.
हेही वाचा: PHOTOS: प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसतील लडाखचे उंट आणि गरुड, जे घडवतील सैन्याच्या शौर्याचे दर्शन
