मुंबई. Raj Thackeray on Dadar Kabutarkhana: मुंबईतील कबुतरखान्याचा वाद बराच रंगला असून यासंदर्भात उच्च न्यायालयाने आपला निर्णय कायम ठेवत कबुरताना खायला घालण्यावर बंदी लागली आहे. या निर्णयाचे स्वागत करत सर्वांनी त्याप्रमाणे वागावे लागेल. जैन मुनींनी या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिली आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी कबुतरखाना व स्वातंत्र्यदिनी मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्याच्या काही महापालिकांच्या निर्णयावर आपली रोखठोक भूमिका मांडली.

राज ठाकरे म्हणाले की, कबुतरखान्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं लागेल. माझ्या मध्यस्थीची मागणी करणाऱ्या जैन मुनींना देखील हे समजले पाहिजे. कबुतरांमुळे काय काय रोग होतात हे समजले पाहिजे. कबुतरांना खायला घालू नये, असा न्यायालयाचा आदेश आहे. त्यामुळे जे कोणी कबुतरांना खायला घालतील त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. आज एखाद्याने खायला घातले तर उद्या अन्य लोकही घालतील, मग उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय हवेत कशाला? कबुतरखान्यासाठी मराठी लोकांनी आंदोलन केले मात्र जेव्हा जैन लोकांकडून दादरच्या कबुतरखान्याजवळ आंदोलन झालं, तेव्हाच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे होती, असंही राज ठाकरे म्हणाले.

मंगलप्रभात लोढांना सुनावलं -

राज ठाकरेंनी राज ठाकरेंनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर देखील निशाणा साधला. लोढा-बिढा सारखी माणसं सारखे मध्ये येतात.  मंगलप्रभात लोढा काही एका समाजाचे मंत्री नाहीत. ते राज्याचे मंत्री आहेत. त्यांनी उच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करून न्यायालय व महाराष्ट्राचा मान ठेवावा, असं राज ठाकरे म्हणाले. हिंदी लादण्याचा मुद्दा फसल्यानंतर सरकारकडून कबुतराचा मुद्दा उपस्थित केला आहे. भविष्यात कुठल्या कुठल्या प्राण्यासाठी आंदोलने होतात काय माहित, असेही राज ठाकरे म्हणाले.

कोणी काय खावे हे सरकारने सांगू नये -

    काही महापालिकांनी स्वातंत्र्यदिनी मांस विक्री बंदीचा आदेश लागू केला आहे, यावर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे, स्वातंत्र्य दिनीच कोणी काय खावे काय खाऊ नये हे सांगणे म्हणजे त्यांच्या स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. मुळात कोणी काय खावे हे सांगण्याचा अधिकार सरकार व महापालिकांना नाही. त्या दिवशी मांसविक्रीची दुकाने सुरू ठेवण्याचे आवाहन मनसेने केले आहे. एखाद्या समाजाच्या उत्सवासाठी अन्य लोकांनी मांसाहार करू नये, हे सांगणे योग्य नाही.